भरधाव कार उसळून १० फूट खोल नाल्यात कोसळली; युवा व्यावसायिकाचा मृत्यू
विवेकानंद स्मारकाजवळ भीषण अपघात
नागपूर: अंबाझरी रोडवर गुरुवारी पहाटे भरधाव कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली आणि सुरक्षा कठडा तोडून १० फुटांपेक्षा अधिक खोल नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात कारचालक कनय अनूप साहनी (वय २९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे ४ वाजेच्या सुमारास स्वामी विवेकानंद स्मारकासमोरील पुलाजवळ ही दुर्घटना घडली.
मृत कनय साहनी हे प्लॉट क्रमांक ५३७, थापर मार्ग, क्लार्क टाउन येथील रहिवासी असून ते ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडित होते. येत्या काही महिन्यांतच त्यांचा विवाह होणार होता आणि कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुभाजक व सुरक्षा कठडा तोडून कार नाल्यात:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनय गुरुवारी पहाटे आपल्या काळ्या रंगाच्या ‘किया सेल्टॉस’ कारने (एमएच ४९ सीडी ८३९०) अंबाझरी टी-पॉइंटकडून गजानन मंदिराच्या दिशेने जात होते. विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव वेगात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार प्रथम दुभाजकाला जोरदार धडकली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेला सुरक्षा कठडा तोडून थेट खोल नाल्यात जाऊन पडली. अपघातानंतर कार नाल्यात सरळ स्थितीत येऊन थांबली.
हा अपघात इतका भीषण होता की कारच्या टायर्सचे निशाण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही उमटले होते. या धडकेत कनय यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आणि ते कारमध्येच अडकून पडले. रात्रीच्या गस्तीवर असलेले सोनेगाव वाहतूक पोलीस आणि माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अंबाझरी पोलिसांनी त्यांना कारमधून बाहेर काढून तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सकाळी ६.२५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मद्यप्राशनाचा संशय आणि पुढील तपास:
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कनय कारमध्ये एकटेच होते. वाहन चालवताना ते मद्याच्या नशेत होते की नाही, हे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवाल आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल. घटनेच्या वेळी कनय यांचे आई-वडील दिल्लीला गेले होते. अपघाताची बातमी समजताच क्लार्क टाउन परिसरातील नातेवाईक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली. आई-वडील नागपुरात परतल्यानंतर सायंकाळी मानकापूर घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी प्रशांत सुरेंद्रकुमार साहनी (५०) यांनी दिलेल्या माहितीवरून अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक रणजित माडगावकर पुढील तपास करत आहेत.

