गोंदिया रेल्वे स्थानकावर थरार! चालत्या एक्स्प्रेसखाली येणाऱ्या प्रवाशाला आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने दिले जीवदान!
फिट आल्याने तोल गेलेल्या प्रवाशाला दीपिका बिसेन यांनी प्राणांची बाजी लावून वाचवले; संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद!
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर २०२६) सकाळी एका प्रवाशाच्या बाबतीत काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. चालती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात किंवा प्रवासादरम्यान अचानक फेफरे (फिट) आल्याने एका प्रवाशाचा तोल जाऊन तो थेट चालत्या ट्रेन आणि फलाटाच्या मधोमध अडकण्याच्या बेतात होता. मात्र, फलाटावर कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) महिला कॉन्स्टेबल दीपिका बिसेन यांनी वाऱ्याच्या वेगाने धाव घेत, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता या प्रवाशाला बाहेर ओढून काढले. त्यांच्या या अदम्य साहस आणि समयसूचकतेमुळे एका प्रवाशाचे बहुमोल प्राण वाचले असून, या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
असा घडला थरार:
मंगळवारी सकाळी १० वाजून ०८ मिनिटांनी गाडी क्रमांक १२७७१ सिकंदराबाद-रायपूर एक्स्प्रेस गोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर दाखल झाली. तीन मिनिटांच्या थांब्यानंतर सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी ही गाडी रायपूरच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागली. गाडीने वेग पकडला असतानाच बोगीच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका ३५ वर्षीय पुरुष प्रवाशाला अचानक फेफरे (मिर्गीचा झटका) आले. त्यामुळे त्याचे शरीरावरील नियंत्रण सुटले आणि तो चालत्या ट्रेनसोबत फरफटत खाली पडण्याच्या गंभीर स्थितीत पोहोचला. क्षणार्धात तो ट्रेनच्या चाकाखाली येऊन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
महिला आरक्षकाने लावली प्राणांची बाजी:
याच वेळी फलाट क्रमांक ४ वर कर्तव्य बजावत असलेल्या गोंदिया आरपीएफ पोस्टच्या महिला कॉन्स्टेबल दीपिका बिसेन यांच्या नजरेस हा प्रकार पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आणि स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता चालत्या गाडीच्या दिशेने धाव घेतली. अत्यंत प्रसंगावधान राखत त्यांनी त्या प्रवाशाला घट्ट पकडले आणि प्रचंड ताकदीने व सूझबुझीने त्याला चालत्या ट्रेनच्या चाकांखाली जाण्यापासून रोखत सुरक्षितपणे फलाटावर बाहेर खेचले.
प्रवाशाची ओळख पटली; सीसीटीव्हीत कैद झाला थरार:
या दुर्घटनेतून सुखरूप बचावलेले प्रवासी बसंत बर्मा (वय अंदाजे ३५ वर्षे) हे असून, ते जनरल तिकीट क्रमांक (PRF-92525955) द्वारे सिकंदराबाद येथून बिलासपूरकडे प्रवास करत होते. प्रथमोपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. हा संपूर्ण थरारक घटनाक्रम रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, अदम्य साहस आणि मानवी संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल दीपिका बिसेन यांचे रेल्वे प्रशासन, सहकाऱ्यांसह प्रवाशांकडूनही भरभरून अभिनंदन केले जात आहे.

