LatestNewsगोंदियाविदर्भ

जिल्ह्यात पुन्हा होणार स्वच्छतेचा जागर; संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२६-२७ ला सुरुवात

जि.प. गटस्तरापासून राज्यस्तरापर्यंत लाखोंची बक्षिसे; जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना ४६.३० लाखांची संधी
गोंदिया :
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान व जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी ११ ऑक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात झाली असून, ३० जानेवारी २०२७ पर्यंत ते राबविले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा स्वच्छतेचा जागर पाहायला मिळणार आहे.
गावांमध्ये स्वच्छतेच्या नव्या सुविधा निर्माण करणे, नागरिकांचे स्वच्छतेबाबत मतपरिवर्तन घडवून आणणे आणि या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरिकांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे, हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा स्तरावर सर्वसमावेशक स्पर्धा राबवून ग्रामस्थांना प्रोत्साहित केले जाणार आहे. याअंतर्गत वैयक्तिक शौचालये व त्यांचा वापर, हागणदारीमुक्त तपासणी अहवाल, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती आणि गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करणे, याबाबत ठोस कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. त्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर समितीचे गठण करून कृती कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.
अभियानाच्या वेळापत्रकानुसार, २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद गटस्तरावर स्पर्धा व तपासणी होईल. त्यानंतर २२ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२७ दरम्यान जिल्हास्तरीय तपासणी आणि ७ ते ३० जानेवारी २०२७ दरम्यान विभागीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे.
या अभियानांतर्गत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे’मधून विजेत्या ग्रामपंचायतींना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये जि.प. गटस्तरावर प्रथम बक्षीस ६० हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम ६ लाख, द्वितीय ४ लाख व तृतीय ३ लाख रुपये, विभागस्तरावर प्रथम १२ लाख, द्वितीय ९ लाख व तृतीय ७ लाख रुपये, तर राज्यस्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३५ लाख व तृतीय ३० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. याशिवाय घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ‘स्व. वसंतराव नाईक पुरस्कार’, पाणी गुणवत्ता व व्यवस्थापनासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ आणि शौचालय व्यवस्थापनासाठी ‘स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार’ असे तीन विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. या विशेष पुरस्कारांसाठी जिल्हास्तरावर प्रत्येकी ५० हजार, विभाग स्तरावर ७५ हजार व राज्य स्तरावर ३ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एकूण ४६ लाख ३० हजार रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. जिल्ह्यातील ५३ जिल्हा परिषद गटांतून प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे एकूण ३१ लाख ८० हजार रुपये, जिल्हास्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना एकूण १३ लाख रुपये आणि विशेष पुरस्काराच्या तीन ग्रामपंचायतींना १ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी होऊन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि गावे आदर्श करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिथचंद्र दोन्तुला यांनी केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *