केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नरत असावे : खासदार डॉ.प्रशांत पडोळे
गोंदिया : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नरत असावे, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशाच्या बैठकीत खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात दिशा समितीची बैठक पार पडली, त्यावेळी खासदार श्री. पडोळे बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, प्रभारी जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, माजी आमदार दिलीप बंसोड, परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी साईकिरण नंदाला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, सहायक वनसंरक्षक विजय धांडे मंचावर उपस्थित होते. यासह पंचायत समितीचे सभापती, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख बैठकीस उपस्थित होते. श्री. पडोळे पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी दिशा समिती गठीत करण्यात आली असून ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या वतीने या योजनांची अंमलबजावणी योग्यपणे व्हावी, अशी दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले.
खासदार श्री. पडोळे यांनी यावेळी, सर्वच महत्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील वनक्षेत्राचा काही भाग बफर झोन म्हणून सरकारने निश्चित केला असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मागितली आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागात वन्यजीव मानव संघर्षाचा त्रास स्थानिक लोकांना होत असून याबाबत बृहद आराखडा तयार करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यात तेंदूपत्ता वेचण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असून वेचणाऱ्या मजुरांनाही विमा योजनेत समाविष्ट करून घेण्याबाबत संबंधित एजन्सींना अधिकाऱ्यांना बंधनकारक करावे, तसेच जिल्ह्यात वनतारा सारखा एखादा प्रकल्प राबविण्यात यावा अशाही सूचना त्यांनी केल्या.
खेलो इंडियासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, त्या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासह गोंदिया हा जिल्हा शेततळ्यांचा जिल्हा असून यामध्ये मत्स्य उत्पादन करून ते निर्यात करण्याची क्षमता आहे. त्याबाबतही संशोधन करून यावर भविष्यात विचार व्हावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. डाक विभागाकडून पासपोर्ट कार्यालय जिल्ह्यात असावे याबाबत पाठपुरावा करावा. जिल्ह्यात वाढत्या प्रदुषणामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून त्याबाबत कडक निर्देश संबंधित उद्योग समूहास देण्यात यावे अशा सूचना खासदार यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील कलावंतांना देण्यात येणारे मानधनाच्या जाचक अटी शिथिल करून मानधन वेळेवर मिळावे यासाठी प्रयत्न व्हावेत. आरोग्य विभागाविषयी बोलतांना श्री. पडोळे यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट विषयी माहिती जाणून घेतली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धर्तीवर प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधीही देण्यात येतो, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांनी प्रधानमंत्री सहायता निधीचाही लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पडोळे यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील बहुसंख्य भाग आदिवासी लोकांचा असल्याने त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबतच्या सूचना केल्या. रोजगार हमी योजनेचा थकीत निधी जिल्ह्यातील कुशल व अकुशल कामगारांना लवकरात लवकर मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी देण्यात आले.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खतासह कंपन्यांकडून अन्यबाबींची आवश्यकता नसतानाही पुरविल्या जातात, त्याबाबत कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. शालेय पोषण आहारा अंतर्गत देण्यात येणारा आहार चांगल्या दर्जाचा असावा याची खातरजमा शिक्षण विभागाकडून व्हावी, यासह सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असावेत, कुठल्याही कारणाने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण याची माहिती यावेळी खासदार पडोळे यांनी जाणून घेतली. पणन विभागातर्फे धान खरेदी होत असून त्यामध्ये शेतकऱ्यांकडून येणाऱ्या तक्रारींचे निवारण जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी त्वरित करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासह सर्वच विभागाबद्दलची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली त्यामध्ये गती यावी, शेतकरी, महिला, बालक, विद्यार्थी, तरुण, वृद्ध नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळावा, नागरिकांच्या समस्या दूर व्हाव्यात या पद्धतीने कार्य करावे अशा सूचनाही खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी यावेळी केल्या.

