गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाचा शासकीय सोहळा
गोंदिया | नवचैतन्य वृत्त
महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार गोंदिया जिल्हा असून जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपदा आहे. या जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या अनेक संधी असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनाचा शासकीय सोहळा पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. सावकारे बोलत होते. या मुख्य शासकीय कार्यक्रमात आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, भारतीय वन सेवेचे अधिकारी पवन कुमार जोंग, यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. सावकारे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या देशभक्तांना अभिवादन केले. महाराष्ट्र संतांची, शूरवीरांची, समाजसुधारकांची भूमी असल्याने महाराष्ट्र देशात पुरोगामी म्हणून ओळखला जातो. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन नागरिकांना विकसित महाराष्ट्र करण्यासाठी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अर्थव्यवस्थेत नक्कीच चांगली कामगिरी करीत असून भविष्यातही करणार असल्याचे ते म्हणाले.
श्री. सावकारे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत गोंदिया येथे तालुकास्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील ३० हजार ९४० विविध शासकीय लाभांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. उर्वरित टप्प्यातील शिबिरे लवकरच होणार असून नागरिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. गतिमान प्रशासन योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये नवीन २५ तलाठी कार्यालय बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्यामार्फत निधी देण्यात आला असून यामुळे तलाठी साजामध्ये कामकाजाला वेग येईल आणि नागरिकांना सेवा तात्काळ उपलब्ध होतील.

भारतात जनगणना सुरू झाली असून जनगणनेमुळे लोकसंख्येची विश्वासार्ह आकडेवारी कळते. जनगणना ही नागरिकांचे लाभासाठी विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन करण्याकरिता महत्त्वाची आहे, तरी आपण सर्वांनी जनगणना २०२७ च्या राष्ट्रीय कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी मंचावरून केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून ‘ज्ञानभारतम्’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत ७५ वर्षांपूर्वीचे अभिलेख आणि हस्तलिखिते जतन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जिल्ह्यातील कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवरी ग्रामीण रुग्णालयाला मिळालेला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याला क्षयरोग निर्मूलनात द्वितीय मानांकन मिळाल्याबद्दल ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार आणि गोंदिया-बल्लारशाह व गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वर्ष २०२४-२५ मध्ये गोंदिया जिल्ह्याला १२२.४८ कि.मी. लांबीचे २७ रस्ते मंजूर करण्यात आले असून त्यातील १५ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धान खरेदीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, १७ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ९८ धान उत्पादक शेतकऱ्यांना ७८६.८९ कोटी रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत ८५ कोटी ८९ लाख ५४ हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील पोलीस दलाने नक्षलवाद विरोधी मोहिमेत उत्कृष्ट काम केले असून १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’ योजनेअंतर्गत आतापर्यंत ४४ हजार ४७६ लाभार्थ्यांना विविध शासकीय कागदपत्रांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. या वर्षापासून २८ एप्रिल हा दिवस ‘लोकसेवा हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.

