LatestNewsगोंदियाविदर्भ

घरफोडी करणाऱ्या चोरट्याला महिलेला गोंदिया शहर पोलिसांकडून अवघ्या ४ तासांत बेड्या!

पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने जप्त; डीबी पथकाची धडक कामगिरी
गोंदिया :
बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील ड्रॉव्हरमधून लाखो रुपयांच्या दागिन्यांची घरफोडी करणाऱ्या एका सराईत महिला चोरट्याला गोंदिया शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (DB पथक) अत्यंत शिताफीने अवघ्या ४ तासांच्या आत गजाआड केले आहे. पोलिसांनी या महिला आरोपीकडून चोरीस गेलेला तब्बल २ लाख ८१ हजार रुपये किमतीचा १०० टक्के सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले असून, पोलिसांच्या या वेगवान आणि कौतुकास्पद कारवाईचे शहरात जोरदार स्वागत होत आहे.
गोविंदपूर येथील आंबेडकर वॉर्ड निवासी फिर्यादी अनिता देवेंद्र राऊत (वय ४५) या २५ ऑक्टोबर रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. २७ ऑक्टोबर रोजी त्या गावाहून परत आल्या. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी त्यांनी बेडरूममधील बेडच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने तपासले असता, तेथे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून सोन्याची कानातील बाली, झुमके, पुण्यशाही नथ, ३ नग सोन्याचे पान-पेंडल, काळ्या मण्यांचे लहान-मोठे दोन मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबर रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ९८५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून महिला संशयित ताब्यात:
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आंबेडकर चौक, जोगलेकर वॉर्ड (गोंदिया) येथे राहणारी संशयित आम्रपाली किशोर गणवीर (वय ३३) हिनेच ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. डीबी पथकाने तत्काळ सापळा रचून तिला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता, तिने सदर घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरीस गेलेले सर्वच्या सर्व सोन्याचे दागिने (किंमत २.८१ लाख रुपये) हस्तगत केले.
सदर प्रशंसनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, तपास अधिकारी तथा डीबी पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस, सहायक पोलीस उपनिरीक्षक कवलपालसिंग भाटिया, पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, निशीकांत लोंदासे, कमलेश शहारे, पोलीस अंमलदार दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे आणि राकेश डोंगरवार यांनी पार पाडली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *