सिरेगावबांध ग्रामपंचायतीने पटकावला ६० लाखांचा पुरस्कार; नागपूर विभागात मारली बाजी!
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’त गोंदिया जिल्ह्याचा डंका : सालेकसाच्या भजेपारने जिल्हास्तरावर मिळवला प्रथम क्रमांक
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६’ अंतर्गत जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीने नागपूर विभागस्तरावर तृतीय क्रमांक पटकावत ६० लाख रुपयांचे भव्य पारितोषिक आपल्या नावे केले आहे. या अभियानांतर्गत ६ नोव्हेंबर रोजी ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला असून, सिरेगावबांधच्या या यशाने गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामपंचायतींमधील विकासकामांची गुणवत्ता, प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामस्थांचा सक्रिय लोकसहभाग या निकषांवर राज्यभरातील ग्रामपंचायतींचे सखोल मूल्यमापन करण्यात आले होते.
नागपूर विभागस्तरावर चुरशीची लढत
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतून झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील धानला ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे, तर भंडारा जिल्ह्यातील खैरी/कलमाझरी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवत ८० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. याच क्रमवारीत गोंदिया जिल्ह्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीने चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांकासह ६० लाखांचा घसघशीत निधी मिळविला.
जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये भजेपार अव्वल
विभागस्तरासोबतच जिल्हास्तरावरही उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये —
प्रथम क्रमांक (५० लाख रुपये) : भजेपार ग्रामपंचायत (ता. सालेकसा)
द्वितीय क्रमांक (३० लाख रुपये) : कोकणा ग्रामपंचायत (ता. सडक-अर्जुनी)
तृतीय क्रमांक (२० लाख रुपये) : खोडशिवणी ग्रामपंचायत (ता. सडक-अर्जुनी)
ग्रामीण विकासाला नवी दिशा व प्रेरणा
गोंदिया जिल्ह्यातील चारही ग्रामपंचायतींनी मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे स्थानिक पातळीवर ग्रामविकासाला नवी गती मिळणार आहे. मिळालेल्या या लाखो रुपयांच्या बक्षीस निधीतून गावांमध्ये पायाभूत सुविधांची कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, डिजिटल सुविधा व महिला सक्षमीकरणाचे नवनवीन उपक्रम राबविण्यास मोठी मदत होणार आहे. पुरस्कारांची अधिकृत घोषणा होताच सिरेगावबांध, भजेपार, कोकणा व खोडशिवणी या गावांमध्ये जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

