रायपूर-गोंदिया विद्युत वाहिनीसाठी ५ हजारांवर वृक्षांवर चालणार कुऱ्हाड; शेतकरी व पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध!
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर झोनमधून जाणार उच्चदाब वाहिनी : वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोंदिया : एकीकडे कर्जत-भीमाशंकर परिसरात विद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीवरून जनआंदोलन पेटले असताना, आता रायपूर ते गोंदिया दरम्यान उच्चदाब विद्युत वाहिनी (हाय-व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन) उभारण्याच्या कामावरून तीव्र विरोधाची ठिणगी पडली आहे. या विद्युत वाहिनीच्या उभारणीसाठी सुमारे साडेपाच हजारांपेक्षा अधिक वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही वाहिनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या अत्यंत संवेदनशील अशा ‘कोअर’ आणि ‘बफर’ क्षेत्रातून प्रस्तावित असल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेवर आणि नैसर्गिक अधिवासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विरोधात परिसरातील शेतकरी व पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले असून मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, तिरोडा येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातून रायपूरपर्यंत ही उच्चदाब विद्युत वाहिनी नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली असून गोंदिया तालुक्यातील ढाकणी, पांगळी, किंडगीपारसह परिसरातील १९ गावांमधून ही विद्युत वाहिनी जाणार आहे.
साडेपाच हजार झाडांचा बळी; अंतिम मंजुरीची प्रतीक्षा
या प्रकल्पासाठी तब्बल ५ हजार ३०० झाडे तोडली जाणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या प्रकल्पासाठी नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्ड, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. आता अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून, त्यांची हिरवी झेंडी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यासाठीचे प्राथमिक सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे.
शेतजमिनीचे क्षेत्र बाधित; शेतकऱ्यांवर संक्रांत
गोंदिया ते रायपूर दरम्यान उच्चदाब वाहिनी नेण्यासाठी शेतशिवारात महाकाय टॉवर उभारले जाणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांची सुपीक व शेतीसाठी उपयोगी असलेली मौल्यवान जमीन मोठ्या प्रमाणावर बाधित होणार आहे. कायमस्वरूपी टॉवर उभारल्याने शेतीचे अपरिमित नुकसान होणार असून मोठ्या प्रमाणावर हिरवीगार झाडे तोडल्याने स्थानिक पर्यावरणाचा समतोल ढासळणार आहे, अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला आहे.
कोअर व बफर क्षेत्र वगळा : पर्यावरणप्रेमींची मागणी
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा वाघ, बिबटे आणि विविध दुर्मीळ वन्यजीवांचे सुरक्षित आश्रयस्थान मानला जातो. अशा समृद्ध जंगलातून उच्चदाबाच्या विद्युत तारा नेल्यास वन्यजीवांना विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचा मोठा धोका संभवतो. तसेच हजारो वृक्षांच्या कत्तलीमुळे जंगलाचा ऱ्हास होणार असल्याने ही विद्युत वाहिनी थेट कोअर व बफर क्षेत्रातून न नेता इतर मार्गाने (बायपास करून) नेण्यात यावी, असा एकमुखी सूर पर्यावरणप्रेमींमधून उमटत आहे.
“उच्चदाब विद्युत वाहिनी उभारण्याला आमचा थेट विरोध नाही; मात्र त्यासाठी हजारो झाडांची होणारी अमानुष कत्तल अजिबात मान्य नाही. वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आणून कोअर आणि बफर क्षेत्रातून ही वाहिनी न नेता ती जंगलाबाहेरून बायपास करून उभारण्यात यावी. अन्यथा प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल.”
— सावन बहेकार, पर्यावरणप्रेमी

