बडनेऱ्यात जुन्या वादातून टोळक्याचा रक्तरंजित थरार! आठवडी बाजारात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या
बडनेरा (अमरावती): जुन्या वैमनस्यातून ५ ते ६ तरुणांच्या टोळक्याने भरवस्तीत दोघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. ही थरारक घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजार परिसरातील देशी दारूच्या दुकानाबाहेर रविवारी घडली. या घटनेने संपूर्ण बडनेरा शहर हादरले असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
शेख कासिम (रा. गुलिस्तान नगर, बडनेरा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र सोहेब शाह सरदार शाह हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. जखमी सोहेबवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
५ ते ६ जणांच्या टोळक्याचा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी शेख कासिम आणि सोहेब शाह हे दोघे आठवडी बाजार परिसरात देशी दारू दुकानाजवळ असताना, जुन्या वादाचा राग मनात धरून आलेल्या ५ ते ६ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, शेख कासिमचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला, तर सोहेब गंभीररीत्या जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकाला घेतले ताब्यात; पोलिसांचा बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक हनुमंत येरला यांच्यासह बडनेरा पोलीस ठाण्याचे पथक, फॉरेन्सिक लॅब पथक व डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर शहरात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवून शांत केली असून पुढील तपास सुरू आहे.

