LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

पोलीस आणि बालकांमधील दुवा अधिक बळकट होणार; गोंदिया पोलीस मुख्यालयात ‘बाल-सुरक्षा’ कार्यशाळा संपन्न

आंगण ट्रस्ट आणि गोंदिया पोलीस दलाचा संयुक्त उपक्रम; ६५ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा उत्स्फूर्त सहभाग
गोंदिया :
बालकांवर होणारे अत्याचार, त्यांचे शोषण आणि लैंगिक गुन्ह्यांसारख्या अतिसंवेदनशील प्रकरणांची हाताळणी अधिक प्रभावीपणे व ‘बालस्नेही’ वातावरणात करण्यासाठी गोंदिया पोलीस दलाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बालसंरक्षण प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने, पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ मे रोजी गोंदिया पोलीस मुख्यालयात ‘बाल-सुरक्षा’ या विषयावर एका विशेष कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि मुंबईतील नामांकित ‘आंगण ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आंगण ट्रस्ट ही संस्था गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ भारतातील बालसंरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. “मुलांचे संरक्षण ही केवळ आपली जबाबदारी नसून, ती समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे,” या उदात्त हेतूने संस्थेचे कार्य सुरू आहे.

या कार्यशाळेसाठी आंगण ट्रस्ट, मुंबई येथील प्रमुख वक्ते म्हणून सौ. गौरी कुमारी, श्री. नयम दमई आणि श्री. वरुण ओतारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन या सर्व तज्ज्ञ वक्त्यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले.
४ ते ५ तासांचे कृतीयुक्त प्रशिक्षण
या कार्यशाळेत तज्ज्ञ वक्त्यांनी पोलिसांना केवळ सैद्धांतिक माहिती न देता, प्रात्यक्षिकांवर भर दिला. बालकांवरील अत्याचार आणि लैंगिक प्रकरणे हाताळताना पोलिसांचा दृष्टिकोन कसा असावा, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालसुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण, सामाजिक परिवर्तन, युवक व कौशल्य विकास आणि बालसुरक्षा क्षेत्रात सकारात्मक विचारसरणी कशी विकसित करावी, यावरही विचारमंथन झाले. विविध खेळ, समूह कृती (Group Activities) आणि कृतीयुक्त प्रशिक्षणाच्या माध्यमातून सलग ४ ते ५ तास हे प्रशिक्षण चालले.
६५ बाल कल्याण अधिकाऱ्यांची उपस्थिती
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून आलेल्या सुमारे ६५ ‘बाल कल्याण पोलीस अधिकारी’ आणि अंमलदारांनी या अनुभवाधारित उपक्रमात सहभाग नोंदवला व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रशिक्षणामुळे पोलिसांचा बालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक संवेदनशील आणि मैत्रीपूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महिला पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपुरकर यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी राखीव पोलीस निरीक्षक (रापोनि) राजेश सरोदे, रापोउपनि दिपक गेडाम, सहाय्यक फौजदार मुस्तफा सरवर, महिला पोलीस हवालदार तनुजा मेश्राम, पोलीस हवालदार लिओनार्ड मार्टिन, संतोष पारधी, राज वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल अतुल कोल्हाटकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी गजभिये यांच्यासह पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी. आय. स्टाफने अथक परिश्रम घेतले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *