धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना गती द्या; आमदार विजय रहांगडाले यांचे निर्देश!
नागपूर येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक : पहिल्या टप्प्यात खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याच्या कामात प्रगती; दुसऱ्या टप्प्याचेही नियोजन
तिरोडा : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर येथील कार्यालयात संबंधित विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार विजय रहांगडाले यांनी योजनेच्या कामांना गती देऊन ती वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीत धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या विविध टप्प्यांत सुरू असलेली कामे, त्यांची सद्यस्थिती, कामात येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी तसेच आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही कामे अधिक वेगाने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी विचारविनिमय झाला. या योजनेमुळे परिसरातील शेतजमिनींना बारमाही सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार असून कृषी क्षेत्राच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.
पहिल्या टप्प्याची प्रगती; १२ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ
योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याच्या कामात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या जलाशयाच्या माध्यमातून परिसरातील १२ गावांना सिंचनाचा थेट लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांवरही बैठकीत चर्चा झाली. तसेच दुसऱ्या टप्प्यांतर्गत चोरखमारा व बोदलकसा जलाशयांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी करावयाच्या नियोजनाचा आणि कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सिंचन सुविधेत वाढ करण्यास सर्वोच्च प्राधान्य
बैठकीत आमदार विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीबाबत आवश्यक सूचना देत प्रलंबित त्रुटी व अडचणींचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ लवकरात लवकर मिळावा, यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक पातळीवर परस्पर समन्वय ठेवून कामे जलद गतीने पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत शाश्वत सिंचन पोहोचविणे हे आपले मुख्य प्राधान्य असून, योजनेच्या प्रत्येक टप्प्याचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका आमदार विजय रहांगडाले यांनी मांडली.
शेतकऱ्यांचे हित आणि परिसराचा सर्वांगीण कृषी विकास साधण्यासाठी ही योजना प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

