गोंदिया जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला मोठे यश; १७१ नवीन रुग्णांसह ४२३ बाधितांवर मोफत उपचार सुरू!
आरोग्य विभागाच्या १,३१४ पथकांकडून ३.४० लाख घरांचे सर्वेक्षण : तब्बल १३.९१ लाख नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी; लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणीचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
गोंदिया : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष ‘कुष्ठरोग शोध मोहिमे’ला मोठे यश मिळाले आहे. या १७ दिवसांच्या कालावधीत आरोग्य विभागाने जिल्ह्यात व्यापक सर्वेक्षण राबवून तब्बल १७१ नवीन कुष्ठरुग्णांचा शोध घेतला आहे. या नवीन रुग्णांच्या नोंदीमुळे आता जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४२३ वर पोहोचली असून, आरोग्य विभागामार्फत या सर्व बाधितांवर तातडीने मोफत बहुऔषधोपचार (MDT) सुरू करण्यात आले आहेत.
वेळेत निदान झाल्यामुळे या रुग्णांना भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य शारीरिक व्यंग व अपंगत्वापासून वाचवणे आता शक्य होणार आहे, असा विश्वास आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.
३.४० लाख घरांचे सर्वेक्षण; १३.९१ लाख नागरिकांची तपासणी
जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात १,३१४ विशेष आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये आशा स्वयंसेविका आणि पुरुष आरोग्य स्वयंसेवकांचा समावेश होता. या पथकांनी जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागांतही घरोघरी जाऊन ३ लाख ४० हजार ४१५ घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या गृहभेटींच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल १३ लाख ९१ हजार २११ नागरिकांची शारीरिक व त्वचा तपासणी करण्यात आली.जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून २५२ कुष्ठरुग्णांवर आधीपासूनच उपचार सुरू होते. आता या विशेष मोहिमेत १७१ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ४२३ झाला आहे. या सर्व ४२३ रुग्णांना आरोग्य विभागामार्फत मोफत औषधोपचार पुरविला जात असल्याची माहिती सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. महेंद्र धनविजय यांनी दिली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांची आकडेवारी
या मोहिमेदरम्यान सखोल तपासणीअंती जिल्ह्यात १७१ नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामध्ये — पी.बी. रुग्ण (Paucibacillary – कमी जंतू असलेले) : ११० रुग्ण, एम.बी. रुग्ण (Multibacillary – जास्त जंतू असलेले) : ६१ रुग्ण
ही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करा :
कुष्ठरोगाचे प्राथमिक अवस्थेतच निदान व्हावे यासाठी नागरिकांनी खालील संशयास्पद लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे —
त्वचेवर फिकट, पांढरट किंवा तांबूस-लाल रंगाचे चट्टे/डाग पडणे.
अशा डागांवर खाज न सुटणे, घाम न येणे अथवा स्पर्श, गरम-थंड संवेदनांची कोणतीही जाणीव न होणे.
हात किंवा पायाच्या बोटांमध्ये सतत बधीरपणा जाणवणे किंवा सुया टोचल्यासारखे वाटणे.
कानाच्या पाळ्या जाड होणे अथवा चेहऱ्यावर सूज/गाठी येणे.
हाताच्या किंवा पायाच्या नसा जाड व दुखऱ्या होणे.
“कुष्ठरोग हा ‘नोटिफाय’ (Notifiable Disease – बंधनकारक नोंदणी असलेला) आजार घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे समाजात किंवा खाजगी रुग्णालयात असा रुग्ण आढळल्यास त्याची नोंद आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत तपासणी आणि संपूर्ण औषधोपचार उपलब्ध आहेत. शरीरावर कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास नागरिकांनी भीती किंवा सामाजिक संकोच न बाळगता त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी.”
— डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया

