LatestNewsगोंदियाविदर्भ

पावसामुळे धानाची नासाडी : पाखर धान घेणार कोण? शेतकर्‍यांचा सवाल

धान खरेदी केंद्र चालक व शेतकरीसुद्धा अडचणीत

गोंदिया : अवकाळी पावसामुळे धान उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त धान पीक पावसात भिजले आहे. पावसाने आठवडाभर उघडीप न ठेवल्यामुळे कडपा व गंजीतील धानाला कोंब फुटले आहेत. त्यामुळे धान पाकर झाले आहे. या धानाच्या विक्रीचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. खरेदी केंद्रांसाठीही या धानाची खरेदी अवघड होणार आहे. त्यामुळे पाखर धान घेणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पावसाचा कहर झाल्याने संपूर्ण पूर्व विदर्भातील धान उत्पादक संकटात सापडले आहेत. गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने धान उत्पादकांचे संकट अधिक गडद झाले आहे. दोन दिवस सूर्यप्रकाश मिळाल्याने धान उत्पादक शर्थीचे प्रयत्न करून कळपा सुकविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बर्‍याच प्रमाणात कळपा अंकुरलेल्या आहेत. मळणीनंतर मिळणारे धान पीक निम्न दर्जाचे आहे. खरेदी केंद्रावर हा धान नियमांच्या अटींमुळे खरेदी होणार नाही. त्यामुळे अशा संकटात शासनाने मध्यस्थीची भूमिका घ्यावी आणि आधारभूत केंद्रधारकांना पाखर झालेल्या धानाच्या खरेदीचे नियोजन करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.ओल्या, भिजलेल्या आणि कोंब फुटलेल्या कडपांकडे पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. हाती आलेले धान डोळ्यादेखत नष्ट झाले आहे. आता भिजलेल्या कडपा रस्त्यावर, अंगणात, तर कधी पाणंद रस्त्यावरही सुकविण्याचा प्रयत्न होत आहे. तिथेच मळणी यंत्राद्वारे मळणीचा प्रयत्नही सुरू आहे. परंतु, पावसात भिजल्याने धान पाखर झाला आहे. यामुळे सदर धान घेणार कोण? असाही प्रश्न शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

………..

खतांची दरवाढ उठलीय शेतकर्‍यांच्या मुळावर !

गोंदिया : आधीच शेतकरी नैसर्गिक संकटामुळे त्रस्त झाले आहेत. यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो की आताचा रब्बी हंगामाच्या तोंडावरील अवकाळी पाऊस; शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत असताना रब्बी हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने नवीन संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक धक्का बसला आहे. पेरणीचा हंगाम सुरू होताच विविध रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकर्‍यांचे गणित बिघडले आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. शासनस्तरावरुन मिळणारी मदतही अप्राप्त आहे. आणि किती मदत मिळेल, याचा नेम राहिला नाही. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्न करणार आहे. असे असतानाच आता खतांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतीत होत असलेल्या पिकांच्या नुकसानीने ताणलेले अर्थकारण आता खतांच्या महागाईमुळे आणखी बिघडले आहे. विविध रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकर्‍यांचे गणित बिघडले आहे.

————-

२५० ते ३५० रुपयांपर्यंत झाली आहेत भाववाढ

या दरवाढीमुळे हेक्टरमागे लागणार्‍या खतांच्या खर्चात तब्बल २५० ते ३५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच युरिया आणि डीएपी खतांची अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून होत आहेत. काही ठिकाणी विक्रेत्यांकडून या खतांसोबत इतर खत जबरदस्तीने दिले जात असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले आहे. कृषी विभागाने वा वाढीव दरांच्या विक्रीवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *