LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

ओडिशावरून येणारा २.६१ कोटींचा गांजा जप्त, आंतरराज्यीय रॅकेटचा भंडाफोड

डीआरआयची मौद्याजवळ मोठी कारवाई; नागपूरमार्गे महाराष्ट्रात जाणार होता माल

नागपूर : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तब्बल ५२२ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २ कोटी ६१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तस्करीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. संबंधित गांजा ओडिशावरून येत होता व परत एकदा महाराष्ट्रात ओडिशावरून होत असलेल्या तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डीआरआयच्या नागपूर प्रादेशिक युनिटने खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली.ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवरून महाराष्ट्राच्या दिक्षने मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अनेक दिवस गुप्त पाळत ठेवून आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून कारवाईचे नियोजन करण्यात आले. डीआरआयच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील माथनी टोल प्लाझा परिसरात संशयास्पद ट्रकला अडवले. हा टाटा मोटर्सचा १६ टन क्षमतेचा एलपीटी-१६१३ ट्रक ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेवरून महाराष्ट्राकडे येत होता.ट्रकची कसून तपासणी करण्यात आली असता, अधिकाऱ्यांना अगोदर काहीच आढळले नाही. मात्र सखोल झडती घेतली असता, चालकाच्या सीटच्या मागे, चालक व सहप्रवाशाच्या आसनावरील गुप्त कप्प्यात कुलूप लावलेल्या टूलबॉक्समध्ये तसेच चालकाच्या केबिनच्या छतावरील जागेत गांजा लपवून ठेवण्यात आल्याची बाब समोर आली. ट्रकमधून ८ मोठ्या बॅंगमध्ये भरलेले गांजाचे २४थ पॅकेट्स आढळून आले. खाकी रंगाच्या प्लास्टिक पट्ट्यांनी हे पॅकेट्स गुंडाळलेले होते. डीआरआयच्या नागपूर युनिटने यापूर्वीदेखील याच वर्षात दोन वेगवेगळ्या पण परस्परांशी संबंधित कारवायांमध्ये १,२५० किलोहून अधिक गांजा जप्त केला होता. त्या कारवायांमध्ये सुमारे ६.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता आणि मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक करण्यात आली होती. ही यंदाच्या वर्षातील तिसरी मोठी कारवाई ठरली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *