एलसीबीकडून अवघ्या १२ तासांत बोथली हत्याकांड उलगडा
पैशाच्या देवाण- घेवाणतून निवृत्त प्राध्यापकाची हत्या
२१ वर्षीय आरोपीच्या आवळल्या मुसक्या
आमगाव/गोंदिया : आमगाव तालुक्यातील बोथली शेतशिवारात घडलेल्या भवभूती महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक चंद्रशेखर भास्कर दहीकर (वय ६१) यांच्या थरारक हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांच्या आत छडा लावला आहे. जमिनीच्या व्यवहारातील टोकनचे ४ लाख रुपये शेअर मार्केटच्या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बुडवल्याने ते परत मागणाऱ्या प्राध्यापकाचा काटा काढण्यासाठी २१ वर्षीय तरुणानेच डोक्यात आणि छातीवर विटांचे घाव घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी अजय शामराव ब्राह्मणकर (वय २१, रा. बोथली) याला गजाआड केले आहे.
सविस्तर असे की, आमगाव तालुक्यातील बोथली येथे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता बोथली येथील शेतशिवारात चंद्रशेखर दहीकर गुरुजी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. जवरी गावच्या पोलीस पाटील सौ. शकुंतला चंद्रकुमार पाथोडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संवेदनशील घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
शेअर बाजारातील तोट्याने केला घात!
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे पसरवले असता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. मृत चंद्रशेखर दहीकर हे घरी एकटेच राहत होते. सप्टेंबर २०२६ मध्ये त्यांनी आपली आमगाव येथील जमीन गावातीलच अजय ब्राह्मणकर याच्या मध्यस्थीने विकली होती. खरेदीदाराकडून टोकन म्हणून ५ लाख रुपये मिळाले होते, ज्यातील ४ लाख रुपये त्यांनी सुरक्षिततेसाठी अजय ब्राह्मणकर याच्या बँक खात्यात ठेवले होते.
दरम्यान, जमिनीच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने रजिस्ट्री होऊ शकली नाही व जमिनीचा सौदा फिस्कटला. त्यामुळे खरेदीदारास २७ ऑक्टोबरच्या दुपारी १२ वाजेपर्यंत टोकनचे ५ लाख रुपये परत करावयाचे होते. दहीकर गुरुजींनी अजयकडे आपल्या हक्काचे ४ लाख रुपये मागितले. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी अजयने ते ४ लाख रुपये स्वतः शेअर मार्केटच्या ‘इंट्राडे ट्रेडिंग’मध्ये गुंतवले होते आणि त्यापैकी तब्बल साडेतीन लाख रुपये बुडाले होते!
रात्री दबा धरून विटांनी केला खात्मा
पैसे परत करण्यासाठी कोणताही मार्ग न उरल्याने अजय ब्राह्मणकर याने दहीकर गुरुजींचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. २६ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजता आरोपी त्यांच्या घराभोवती दबा धरून बसला होता. दहीकर गुरुजी गावातून पायी चालत घराकडे परत येत असतानाच आरोपीने त्यांच्यावर झडप घातली. डोक्यावर आणि छातीवर विटांचे जोरदार घाव घालून त्यांची जागीच हत्या केली आणि मृतदेह घरासमोरील झुडपांमध्ये लपवून आरोपी पसार झाला.
अजय ब्राह्मणकर अखेर जेरबंद
संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेने अजय ब्राह्मणकर याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आमगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अमरदीप खाडे, सफौ राजू मिश्रा, पोहवा तुळशीदास लुटे, दीक्षितकुमार दमाहे, विठ्ठलप्रसाद ठाकरे, महेश मेहर, संजय चव्हाण, सुबोध बिसेन, सोमेन्द्रसिंग तुरकर, रियाज शेख, राजकुमार खोटेले, भोजराज बहेकार, इंद्रजित बिसेन, पोशि राकेश इंदुरकर, हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले, कुणाल बारेवार, निखिल मेश्राम, नापोशि शैलेश निनावे, चापोशि राम खंदारे, इमरान सैय्यद, विलेश ठाकरे तसेच सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके, पोशि योगेश राहिले व श्रेयस लांबट यांनी फत्ते केली.

