आमदार सांस्कृतिक महोत्सव: रास गरबा-दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, गडचिरोली, चिमूर, भंडारा येथील चमूंचा सहभाग
सडक अर्जुनी (गोंदिया) : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सांस्कृतिक रंगांची उधळण देत आमदार सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित रास गरबा-दांडिया स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी लॉन समोरील प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध नृत्याच्या आकर्षक हालचाली आणि ढोल-तालाच्या गजराने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.
या स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यासह नागपूर, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा येथील विविध चमूंनी सहभाग नोंदविला. सहभागी स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने आणि आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक चमूच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. पारंपरिक गरबा-दांडियाच्या माध्यमातून विविध भागांतील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यामुळे या स्पर्धेला केवळ मनोरंजनाचेच नव्हे, तर सांस्कृतिक एकात्मतेचेही विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार इंजि. राजकुमार बडोले उपस्थित होते. तर अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, नगराध्यक्ष तेजराम मडावी, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, चंद्रकला डोंगरवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष रजनी गिरेपुंजे, भाजप तालुका मंडळ अध्यक्ष राजेश कठाणे, भाजप महिला अध्यक्ष शितल गौर, शेषराव गिरेपुंजे, पं.स. सदस्य वर्षा शहारे, नगरपंचायत उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, न.पं. सभापती कमला अग्रवाल, सदस्य महेंद्र वंजारी, नगरसेविका शशिकला टेंभुर्णे, दीक्षा भगत, रजनी परिहार, रेणू अग्रवाल, शिवसेना तालुका अध्यक्ष विलास कापगते, सरपंच प्रशांत बालसंवार, सरिता कापगते, विनोद बारसागडे, लक्ष्मीकांत तागडे, राजकुमार भगत, राजेश मुनीश्वर, अनिल मुनीश्वर, संपादक सुशील लाडे, महेश सूर्यवंशी, देवा लंजे आणि अश्विनीताई वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण विक्की सय्याम आणि प्रियंका कोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हितेश डोंगरे यांनी मांडले, तर संचालन जितेंद्र मेश्राम आणि मुन्ना राऊत यांनी केले. या उपक्रमामुळे नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित होण्यासोबतच सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यास मोठा हातभार लागला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच निसर्ग फाउंडेशन सडक अर्जुनीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

