भंडाऱ्यात हळहळ: वैनगंगा नदीत बोट उलटून दोन मित्रांना जलसमाधी!
करचखेडा बेटावर आंघोळीसाठी गेले होते सात तरुण; पाच जण बालंबाल बचावले
भंडारा / कारधा : मित्रांसोबत नदीपात्रातील बेटावर आंघोळीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या सात तरुणांच्या परतीचा प्रवास काळ बनून आला. वैनगंगा नदीत करचखेडा बेटावरून परत येत असताना अचानक नाव (बोट) उलटल्याने घडलेल्या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. तर पाच मित्रांनी प्रसंगावधान राखत पोहत नदीचा काठ गाठल्याने ते बालंबाल बचावले.

ही थरारक व दुर्दैवी घटना ७ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय २६, रा. चांदणी चौक, भंडारा) आणि पवन मुरली चौबे (वय ३४, रा. आंबेडकर वॉर्ड, भंडारा) अशी जलसमाधी मिळालेल्या दुर्दैवी युवकांची नावे आहेत. ८ जून रोजीआलेल्या शोधमोहिमेत दोघांचेही मृतदेह शोधण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहराजवळील करचखेडा येथील वैनगंगा नदीपात्रात ७ जून रोजी सायंकाळी भंडाऱ्यातील ७ मित्र एका बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. आंघोळ आटोपून सायंकाळी सर्वजण त्याच बोटीने परत निघले. मात्र, नदीच्या मध्यभागी पोहोचताच पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा अन्य कारणाने बोट अचानक उलटली. बोट उलटताच सर्वजण पाण्यात फेकले गेले. यातील आकाश केवट, सुबोध ढोक, काशीनाथ मेश्राम, मृणाल मंदुकर आणि अर्जुन मेश्राम या पाच जणांनी हिंमत न हारता पोहत नदीचा काठ गाठला. मात्र, पवन आणि कृष्णा या दोघांना पाण्याचा प्रवाह सहन न झाल्याने ते नदीत बुडाले.
SDRF कडून मृतदेह बाहेर
घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस व जिल्हा प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या. ८ जून रोजी सकाळी जिल्हा शोध व बचाव पथकाला (SDRF) पाचारण करण्यात आले. पथकाने नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून दुपारी दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. कारधा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

