Deori flyover : उड्डाणपुलाच्या त्या नांदुरूस्त भागातून धोकादायक वाहतूक
दुरूस्तीचे काम कासवगतीने
देवरी : तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. या महामार्गावर वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मरामजोब परिसरात उड्डाणपूल निर्मितीचे काम करण्यात आले. परंतु, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे उड्डाणपुलावरील (Deori flyover ) काही भाग कोसळला. यामुळे बांधकामाचे वाभाडे निघाले. तर दुसरीकडे सदर भाग अद्यापही दुरूस्तीचे काम सुरू असून मंदगतीने केले जात आहे. यामुळे उड्डाणपुलावरून या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर वाहतूक धोकादायक ठरत असून त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
रायपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर वन्यजीव संरक्षणाकरिता शिरपूर/बांध तसेच मरामजोब परिसरात दोन उड्डाण पुलाचे (Deori flyover ) बांधकाम कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. कामाच्या गुणवत्तेला घेवून स्थानिक नागरिक आणि रहदारी करणारे वाहन धारक नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मरामजोब परिसरातील उड्डाणपूलाचा काही भाग कोसळला. त्यामुळे या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कंत्राट कंपनीच्या वतीने बॅरिगेट्स, काही ठिकाणी पांढर्या रंगाच्या पोती रस्त्यावर ठेवून उपाययोजना करण्यात आली. तर दुसरीकडे पुलाचा भाग कोसळल्याने मागील दोन ते अडीच महिन्यापासून या भागात एकेरी वाहतूक सुरू केली आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या मार्गावरून जड वाहतूकीसह अनेक प्रकारचे वाहन रात्रंदिवस धावत असतात. अशात प्रवास करणे धोकादायक झाले आहे. एकेरी वाहतुकीने परिसरात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तीन पदरी असलेला उड्डाणपूल (Deori flyover ) हा एक पदरी झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तर नांदुरूस्त भागातून वाहतूक करताना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे कासव गतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास केव्हा येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंत्राट कंपनीने लवकरात लवकर बांधकाम करावे, अशी मागणी वाहन धारकांकडून केली जात आहे.
……………………
एकेरी वाहतूक ठरतेय जीवघेणी
उड्डाणपुलावरील (Deori flyover ) कोसळलेल्या भागात एकेरी वाहतुकीमुळे अनेक वाहन धारक चांगलेच अडचणीत येत आहेत. शिवाय महामार्ग असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताची शक्यता नेहमीच असते. याठिकाणातून वाहन धारकाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अडीच ते तीन महिन्यांपासून सदर नांदुरूस्त भाग दुरूस्तीचे काम सुरू आहे. पण गती मिळत नसल्याने बांधकामाची गती संथ पडली आहे. परिणामी दिवसेंदिवस या ठिकाणाहून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशीही मागणी केली जात आहे.

