महागाव ग्रामपंचायतीची धडक कारवाई; ३६ अनधिकृत मोटार व टिल्लू पंप जप्त
नळधारकांचे धाबे दणाणले; पाणी चोरांवर प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोठी कारवाई; नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : गावातील प्रत्येक नागरिकाला समान आणि पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळावे यासाठी महागाव ग्रामपंचायत प्रशासनाने बुधवारी (ता. ११) पाणी चोरांविरुद्ध थेट युद्ध पुकारले. गावातील विविध प्रभागांमध्ये सकाळीच धडक मोहीम राबवून नळाला बेकायदेशीरपणे लावलेले तब्बल २३ मोटार पंप आणि १३ टिल्लू पंप असे एकूण ३६ पंप जप्त केले. ग्रामपंचायतीच्या या धडक आणि अचानक झालेल्या कारवाईमुळे अनधिकृतपणे पाणी उपसणाऱ्या नळधारकांचे धाबे दणाणले असून गावात एकच खळबळ उडाली आहे.
महागाव अंतर्गत गावातील शेवटच्या घरापर्यंत नियमित व योग्य दाबाने पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही स्वार्थी खाजगी नळधारकांनी मुख्य जलवाहिनीवरून थेट नळजोडणीला बेकायदेशीर मोटार व टिल्लू पंप जोडून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसणे सुरू केले होते. यामुळे गावातील अनेक भागांत नागरिकांना कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्या होत्या.
या गंभीर बाबीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता बुधवारी सकाळीच विविध प्रभागांमध्ये धाडसत्र सुरू केले. यावेळी पथकाने घराघरांमध्ये जाऊन तपासणी केली असता, अनेक ठिकाणी थेट मोटार पंप सुरू असल्याचे रंगेहात आढळून आले. पथकाने तात्काळ कारवाई करत ३६ पंप जप्त केले.ही धडक कारवाई महागावचे प्रशासक प्रभाकर कोवे, ग्रामपंचायत अधिकारी अरुण हातझाडे, प्रशासकीय समिती सदस्य चंद्रभान पुस्तोडे, त्र्यंबक झोळे, छगन साखरे, गोविंद वाघाडे, ईबर आतरामे यांच्यासह ग्रामपंचायत लिपिक, पाणीपुरवठा कर्मचारी व मजुरांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
………..
नियम तोडणाऱ्यांची गय नाही: प्रशासनाचा इशारा
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवर गावातील प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा नळाला थेट पंप लावून इतरांच्या हक्काचे पाणी पळवणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. भविष्यातही अशा प्रकारची अचानक तपासणी आणि दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू राहील, असा कडक इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे.

