LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या तीन तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू; सुसाट जीपची दुचाकीला जोरदार धडक!

काटोल-कोंढाळी मार्गावरील कलकुही शिवारातील घटना
कोंढाळी/काटोल (नागपूर) :
नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या तीन निष्पाप तरुणांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या जीपने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच जागीच मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास काटोल-कोंढाळी मार्गावरील कलकुही शिवारात घडला. धडक दिल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी जीप घेऊन पसार झालेल्या चालकाला पोलिसांनी नंतर पाठलाग करून अटक केली आहे. दीपांशु दामोदर चाफले (वय २५), रोशन मारोती चाफले (वय २५) आणि लोकेश जगदीश बारंगे (वय २५, सर्व रा. विकास नगर, कोंढाळी) अशी मृतांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, तिघेही तरुण एकाच दुचाकीने काटोल व पारडसिंगा येथील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये देवीच्या दर्शनासाठी गेले होते. रात्री दर्शन आटोपून ते कोंढाळीकडे परत येत असताना, कलकुही शिवारात काटोलच्या दिशेने वेगात जाणाऱ्या जीपने (क्रमांक MH-27/BE-4389) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तिघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला.
मृतकांमध्ये दोन चुलत भावांचा समावेश; अवघ्या ३ महिन्यांपूर्वी झाले होते एकाचे लग्न
मृतकांमधील दीपांशु आणि रोशन हे दोघे सख्खे चुलत भाऊ होते. हे सर्व तरुण मूळचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) परिसरातील रहिवासी होते. मात्र, पोटापाण्यासाठी ते बऱ्याच काळापासून कोंढाळी येथे येऊन स्थायिक झाले होते. कोंढाळी-नागपूर मार्गावरील एका सोलर कंपनीत ते मजूर म्हणून काम करत होते. रोशनला दोन लहान मुले आहेत, तर लोकेशचा विवाह अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच झाला होता. दीपांशु अविवाहित होता. या घटनेमुळे विकास नगर परिसरात आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जखमींना रस्त्यावर सोडून चालक पळाला
अपघात घडला त्यावेळी जीपमध्ये मोहगाव (ढोले) येथील भाविक बसलेले होते, जे स्वतः देवीच्या दर्शनासाठी काटोलकडे जात होते. धडक बसल्यानंतर माणुसकी दाखवून जखमींना रुग्णालयात नेण्याऐवजी जीपचालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी अवस्थेत काही वेळ रस्त्यावरच पडून राहिले. त्याच वेळी काटोलकडे जाणाऱ्या जुबेर शेख व सागर भारसाकले या जागरूक नागरिकांची नजर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणांवर पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने पोलिसांना पाचारण केले.  #Vidarbha  #VidarbhaUpdates  #Gondia #Wardha #Nagpur #Bhandara #Chandrapur #Gadchiroli #Maharashtra #LocalNews #MarathiNews
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) ग्रामीण रुग्णालयात पाठवले. फरार झालेल्या जीपचालकाचा शोध घेत पोलिसांनी त्याला गाडीसह ताब्यात घेऊन अटक केली असून, त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *