LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

नवेगाव बांधच्या अथांग लाटांवर पर्यटनाची ‘स्वारी’; खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते बोटिंगचा दिमाखदार शुभारंभ

५० कोटींचा विकास आराखडा मंजूर होणार: माजी मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

नवेगाव बांध : विदर्भाचे नंदनवन आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार असलेल्या नवेगाव बांधच्या सौंदर्यात आता एका ‘रॉयल’ सुविधेची भर पडली आहे. येथील अथांग जलाशयावर खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ‘नौकाविहार’ (बोटिंग) सुविधेचा नुकताच दिमाखात शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे नवेगाव बांध आता केवळ व्याघ्र पर्यटनासाठीच नव्हे, तर जलपर्यटनासाठीही देशाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.

नवेगाव बांध पर्यटन संकुलाला जागतिक स्तरावर एक नवीन आणि वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी एस. के. इन्फ्राचे सुनील तरोणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गेल्या काही काळापासून या पर्यटन स्थळाकडे होणारे दुर्लक्ष दूर करून, त्याला पुन्हा एकदा ‘नवेगाव बांधचे गतवैभव’ प्राप्त करून देण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. केवळ व्यवसाय म्हणून न बघता, या परिसरातील नैसर्गिक संपन्नतेचा आदर राखत त्यांनी नौकाविहारासारखी आधुनिक सुविधा येथे आणली. तरोणे यांची ही दूरदृष्टी केवळ पर्यटनापुरती मर्यादित नसून, यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देणे आणि नवेगाव बांधचे नाव देशाच्या पर्यटन नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनांमुळे आणि अथक परिश्रमांमुळेच आज या पर्यटन स्थळाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होत आहे.नवेगाव बांध पर्यटन संकुल परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ५० कोटी रुपयांचा विशेष विकास आराखडा मंजूर केला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी दिली. यामुळे या परिसरातील रस्ते, निवास व्यवस्था आणि इतर जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांना गती मिळणार आहे. शुभारंभ प्रसंगी बोलताना खा. प्रफुल पटेल म्हणाले की, नवेगाव बांधच्या निसर्गसौंदर्याला आता नौकाविहाराची जोड मिळाल्याने देश-विदेशातील पर्यटक येथे खेचले जातील. यामुळे केवळ मनोरंजनच नाही, तर मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगारही निर्माण होईल. सकाळी जंगलात व्याघ्र दर्शन आणि सायंकाळी जलाशयात नौकाविहार, अशा ‘सुवर्णसंगमामुळे’ हे क्षेत्र आता राज्याचे प्रमुख पर्यटन हब बनणार आहे.या भव्य सोहळ्याला माजी आमदार राजेंद्र जैन, लायकराम भेंडारकर, देवेंद्रनाथ चौबे, चंद्रपाल चौकसे, आम्रपाली डोंगरवार, रचनाताई गहाणे, गंगाधर परशुरामकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज उपस्थित होते. तसेच अविनाश काशीवार, केवलराम पुस्तोडे, संदीप कापगते, नवेगावबांध फाउंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, सचिव रामदास बोरकर, प्रमोद लांजेवार, शैलेश जायस्वाल, नामदेव डोंगरवार, दादाजी फुंडे, नितीन पुगलिया, होमराज पुस्तोडे, पुष्पलताताई द्रुगकर, अनिरुद्ध कांबळे, समीर बनसोडे, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे आणि राकेश लंजे यांच्यासह शेकडो निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही गोंदिया जिल्ह्यातील पहिलीच आधुनिक बोटिंग सेवा असून, एस. के. इन्फ्राच्या या पुढाकारामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन उघडले गेले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *