सिंधी भोजापूर शिवारात पट्टेदार वाघाचा थरार; हल्ल्यात दोन गायींसह शेळी ठार!
सावरला परिसरात भीतीचे सावट : दुपारच्या सुमारास गुरांच्या कळपावर हल्ला
सावरला/लाखांदूर : गुडेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावरला नजीकच्या सिंधी भोजापूर शेतशिवारात पट्टेदार वाघाने पाळीव जनावरांच्या कळपावर भरदिवसा हल्ला चढवून दोन गायी आणि एका शेळीला जागीच ठार केले. ही थरारक घटना रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत पसरली असून, शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाटसरूंच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सविस्तर वृत्त असे की, सावरला व सिंधी भोजापूर परिसराला लागून घनदाट जंगल परिसर आहे. या जंगलात वाघासह इतर हिंस्र वन्यजीवांचा मुक्त वावर असतो. सध्या शेतातील कामांचे दिवस असल्याने शेतकरी जंगलालगतच्या आपल्या शेतशिवारात गुरे चरण्यासाठी घेऊन जातात. रविवारी दुपारी जनावरे चरत असताना जंगलातून दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक पाळीव जनावरांच्या कळपावर झडप घातली.दोन गायी आणि शेळीचा बळीवाघाने केलेल्या या भीषण हल्ल्यात स्थानिक शेतकरी श्रीकांत जिभकाटे यांच्या मालकीच्या दोन दुभत्या गायी, तर मदन हटवार यांच्या मालकीची एक शेळी जागीच ठार झाली. वाघाच्या हल्ल्याने इतर जनावरांची एकच पळापळ झाली. हा प्रकार लक्षात येताच गुराख्यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला.शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसानयंदा आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातच ऐन सणासुदीच्या तोंडावर भरदिवसा वाघाने हल्ला करून पाळीव जनावरे ठार केल्यामुळे शेतकरी श्रीकांत जिभकाटे व मदन हटवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले होत असल्याने या भागात वाघाचा कायमस्वरूपी मुक्काम असल्याचे स्पष्ट होत असून, नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणीघटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत जनावरांचा पंचनामा केला. वनविभागाने मृत जनावरांच्या मालकांना तात्काळ योग्य व भरीव आर्थिक नुकसानभरपाई मंजूर करावी, तसेच या परिसरात वाघाचा वावर पाहता गस्त वाढवून त्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

