महावितरणच्या भरारी पथकांचा मोठा दणका: विदर्भात 6 महिन्यांत 21.36 कोटींची वीजचोरी उघड; 111 ग्राहकांवर गुन्हे दाखल
नागपूर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कार्यरत सुरक्षा व अंमलबजावणी विभागा अंतर्गत असलेल्या भरारी पथकांनी वीजचोरी आणि अनधिकृत वापरा विरोधात धडक कारवाई मोहीम राबवत अवघ्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर 2026) तब्बल 21.36 कोटी रुपयांचे वीजचोरी व अनियमिततेचे गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. नागपूर परिक्षेत्रातील भरारी पथकांनी संपुर्ण विदर्भात 5,151 वीज जोडण्यांची सखोल तपासणी करून ही मोठी कामगिरी बजावली आहे.
या मोहिमेदरम्यान 1,311 ग्राहकांकडून विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये 14.85 कोटी रुपयांची थेट वीजचोरी पकडण्यात आली आहे. तर कलम 126 व इतर 481 प्रकरणांखाली 6.50 कोटी रुपयांची अनियमितता आढळली आहे. महावितरणच्या पथकांनी या कारवाईनंतर प्रभावी वसुली मोहीम राबवून निर्धारणापैकी तब्बल 15.83 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात यश मिळवले आहे. तसेच वीजचोरीची रक्कम न भरणाऱ्या 111 ग्राहकांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विभागाच्या या मोहिमेचा मंडलनिहाय आढावा पाहता अकोला 327.30 लाख (वसुली 183.48 लाख), अमरावती 185.56 लाख (वसुली 169.63 लाख), बुलढाणा 118.31 लाख (वसुली 96.01 लाख), भंडारा 156.60 लाख (वसुली 132.28 लाख), चंद्रपूर 145.39 लाख (वसुली 96.54 लाख), नागपूर शहर 213.80 लाख (वसुली 185.55 लाख), नागपूर ग्रामीण 127.59 लाख (वसुली 71.37 लाख), वर्धा 96.82 लाख (वसुली 43.89 लाख), यवतमाळ 112.37 लाख (वसुली 92.52 लाख), गोंदिया 100.40 लाख (वसुली 74.34 लाख), गडचिरोली 76.12 लाख (वसुली 66.90 लाख) आणि वाशीम जिल्ह्यात 243.36 लाख (वसुली 197.19 लाख) रुपयांचे निर्धारण करण्यात आले. याशिवाय अकोला शहर, अमरावती शहर व नागपूर सिव्हिल लाईन्स या विभागांतूनही 233.21 लाखांचे निर्धारण करून 173.33 लाखांची वसुली करण्यात आली आहे.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अपर्णा गिते (म.पो.से.) आणि नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुनील थापेकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात मंडळ स्तरावर 12 विशेष भरारी पथके आणि विभागीय स्तरावर 3 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, नागपूर आणि अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडळ कार्यालये कार्यरत आहेत. वीजचोरी हा गंभीर सामाजिक व कायदेशीर अपराध असल्याने नागरिकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच वीज वापरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच परिसरात वीजचोरी आढळल्यास त्याची गोपनीय माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवून त्यास महावितरणतर्फे योग्य ते बक्षीस दिले जाईल.
विभागनिहाय भरारी पथकांचे सक्षमीकरण: विभागनिहाय भरारी पथकांचा अधिक प्रभावी व गतिमान पद्धतीने वापर करण्यासाठी या पथकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. यानुसार नागपुर परिमंडलांतर्गत असलेल्या प्रत्येक विभागात ही भरारी पथके कार्यरत करण्यात आलि अहे. महावितरणचे हे विशेष पथक वीजचोरीच्या आधुनिक व क्लिष्ट प्रकारांवर बारीक लक्ष ठेवून कारवाई तीव्र करणार आहे. ही भरारी पथके वीज मीटरमधील फेरफार, सीटी (CT) व पीटी (PT) मधील छेडछाड, इलेक्ट्रॉनिक बायपास, थेट वीज जोडणी (Direct Tapping) तसेच अनधिकृत वीज वापराशी संबंधित इतर सर्व गंभीर अनियमितता शोधून काढणार आहेत. संशयास्पद जोडण्यांची तातडीने सखोल तपासणी करून, जेथे मीटरमध्ये फेरफार आढळेल ती प्रकरणे थेट कायदेशीर वीजचोरीच्या गुन्ह्यांमध्ये रूपांतरित करून कठोर कारवाई केली जाणार आहे.

