HealthLatestNewsगोंदियामहाराष्ट्र

कुष्ठरोग निर्मूलनासाठी ‘स्पर्श’ जनजागृती अभियान व ‘कुसुम’ विशेष मोहीम

३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान जिल्हाभर व्यापक उपक्रम

गोंदिया – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.३० जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो.या अनुषंगाने दि.३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत ‘कुसुम’ विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.अभियाना दरम्यान नागरिकांनी कुष्ठरुग्ण आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. जनजागृती,तपासणी व उपचार ह्या त्रिसुत्रीने कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाला दिले आहे.आज दि.30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समन्वय सभा संपन्न झाली.

“भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या” हे स्पर्श जनजागृती मोहीम २०२६ चे घोषवाक्य असून, कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करणे, भेदभाव कमी करणे, लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. कुष्ठरुग्ण हा आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो.म्हणुन नागरिकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन तपासणी करणे आवश्यक असल्याचे ह्याप्रसंगी म्हटले आहे.लवकर निदान,तत्पर उपचार केल्यास कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो.ह्या आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. शरीरावर कोणताही लालसर फिकट बधिर (संवेदना नसलेला )चट्टा,तेलकट गुळगुळीत चकाकणारी त्वचा तसेच कानाच्या पाळीवर व शरीरावर गाठी येणे,हाताच्या बोटांमध्ये व पायाच्या पंज्यांमध्ये अशक्तपणा व कमजोरी येणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.लवकर निदान व लवकर उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, विकृती टाळता येते आणि रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन सुलभ होते, हा महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र धनविजय,कुष्ठरोग कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावडे यांनी केले आहे. कुष्ठरोगाविषयी समाजात अजूनही भीती, गैरसमज व कलंक दिसून येतो.याचा परिणाम रुग्णांच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व व्यावसायिक जीवनावर होतो.ही परिस्थिती बदलण्यासाठी स्पर्श अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, तरुण मंडळे, बाजारपेठा, आरोग्य मेळावे, नुक्कड नाटके, प्रभात फेऱ्या, मॅरेथॉन, वतृत्व-चित्रकला-रांगोळी-स्पर्धा व प्रदर्शन तसेच माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. याच कालावधीत शाश्वत विकास ध्येय २०२७ अंतर्गत शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करण्यासाठी ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेद्वारे नियमित सर्वेक्षणातून वंचित राहणारे घटक — जसे की स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, चिरेखाण कामगार, कारखान्यातील कामगार, कारागृहातील कैदी , आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी, साखर/धान मिल कामगार आदींचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील 48 आश्रमशाळा,45 निवासी होस्टेल,36 विटाभट्टी, स्थलातंरीत 18 ठिकाणे,3 खाण,विशेष अति जोखमीचे 35 ठिकाणे असे एकूण 182 अतिसंवेदनशील भागामध्ये 26920 नागरिकांची 154 टीम द्वारे आशा व पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने संशयित रुग्णांची त्वरीत तपासणी व संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निदान व उपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर देण्यात येणार आहे.सहवासितांची तपासणी करून पात्र व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधोपचार(पीईपी) (किमोप्रोफायलॅक्सिस) देण्यात येणार आहेत,अशी माहिती कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र धनविजय यांनी दिली आहे. कुष्ठरुग्णांसोबत समाजात भेदभाव न होता सन्मानाने जगण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे व प्रत्येक कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे.सामाजिक कारणाने कुष्ठरोग लपवण्याकडे लोकांचा विशेषतः महिला भगिनीचा कल असतो.आरोग्य विभागाने सोशल मिडिया, सामाजिक संस्था व इतर माध्यमाद्वारे लोकांचे प्रबोधन करून योग्य उपचाराने हा आजार बरा होतो असा विश्वास देवून जास्तीत जास्त संशयित रुग्णांची तपासणी करावी.माननीय पंतप्रधान व राज्याचे आरोग्य मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय गाठण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी केले.जिल्हा स्तरिय सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,वैद्यकिय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावंडे,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,आय.ई.सी विभागाचे प्रशांत खरात,अवैद्यकिय पर्यवेक्षक विवेक पडोळे यांचेसह शिक्षण विभाग, बालविकास विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *