दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याने काटेकोर जल नियोजन करावे : अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे
गोंदिया : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून पुढील आठ महिन्यांसह भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी सर्वंकष जल व्यवस्थापन आराखडा तयार करावा, असे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी केंद्रीय भूमिजल मंडळ, मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सायंटिस्ट-डी, केंद्रीय भूमिजल बोर्ड, मध्य क्षेत्र, नागपूरच्या प्रीती राऊत, सायंटिस्ट-सी, मोदी दुर्गाप्रसाद, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गोंदियाचे कुणाल इंगळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषदेचे अजिंक्य आर. वानखेडे, जिल्हा कृषी विभाग अधीक्षक निलेश आर. कनवाडे, सहायक भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गोंदियाचे डॉ. अभिजीत धारशिवकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे, अविनाश भोगे, प्रतीक श्रीकोंडावर, कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, गोंदिया, सहायक भूवैज्ञानिक, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषदेचे प्रतीक फुलकर यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गोंदिया जिल्हा निश्चित पर्जन्यमानाचे क्षेत्र म्हणून ओळखला जात असला तरी यावर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. आलेल्या पावसाचे योग्य नियोजन करून उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. हवामान बदल तसेच आंतरवार्षिक पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करून बदलत्या मान्सूनचा शेती, भूजल आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज असल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्याला लाभलेले समृद्ध वनक्षेत्र, वन्यजीव तसेच नागरिक आणि शेती यांना आवश्यक पाणी उपलब्ध राहील, याचा विचार करून जल नियोजन करावे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे, जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आणि भूजल पातळी अबाधित राखणे यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
धान पिकासोबत कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा विचार
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती केली जाते. धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने भविष्यात पावसाच्या अनियमिततेचा या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विविधीकरणाची मानसिकता निर्माण करून कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन द्यावे. यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवून आवश्यक ती कामे संबंधित योजनांच्या माध्यमातून पूर्ण करावीत, असेही श्री. घोरपडे यांनी सांगितले. जलसंधारणाची कामे करताना भूजल पातळीचे संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन हे केवळ आगामी आठ महिन्यांपुरते मर्यादित न ठेवता भविष्यातील गरजांचा विचार करून शास्त्रीय पद्धतीने करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भूजल व्यवस्थापन आराखड्याच्या शिफारसींचे सादरीकरण
कार्यशाळेत केंद्रीय भूमिजल मंडळ, मध्य क्षेत्र, नागपूर यांच्याकडून राष्ट्रीय जलस्रोत नकाशीकरण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या *‘अॅक्विफर मॅनेजमेंट प्लॅन’च्या शिफारसी तसेच गोंदिया जिल्ह्यातील भूजलाची गुणवत्ता याबाबत सादरीकरण करण्यात आले. उपलब्ध भूजलसाठा, त्याची गुणवत्ता आणि भविष्यातील जल व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.

