LatestNewsविदर्भ

भांडेवाडी गोळीबार प्रकरणाचा धागादोरा लागला; जरीपटक्यातून ३ पिस्तुल व २ जिवंत काडतुसांसह कुख्यात गुन्हेगार ‘थापा’ जेरबंद!

नागपूर क्राईम ब्रँच युनिट-५ ची धडक कारवाई; १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : नागपुरातील गाजलेल्या भांडेवाडी गोळीबार प्रकरणाचा छडा लावत असताना गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून कुख्यात गुन्हेगार आकाश राजन थापा (वय २९, रा. लुंबिनीनगर, मेकोसाबाग) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून ३ देशी बनावटीचे पिस्तुल, २ जिवंत काडतुसे आणि २ मोबाईल असा एकूण १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे उपराजधानीतील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भांडेवाडी परिसरातील गोळीबार प्रकरणात संशयित आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना क्राईम ब्रँचला पक्की गुप्त माहिती मिळाली की, कुख्यात गुन्हेगार आकाश थापा हा मेकोसाबाग येथील लेंडी मैदान व मातृछाया वाचनालयाजवळ हातात प्राणघातक शस्त्रे नाचवून नागरिकांना धमकावत आहे. माहिती मिळताच युनिट-५ च्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चोहोबाजूने घेराबंदी करत थापाला ताब्यात घेतले.
अंगझडती आणि घरातून ३ पिस्तुल, देशी कट्टा जप्त!
पोलिसांनी आरोपी आकाश थापा याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे स्टील मॅगझिन असलेली एक देशी पिस्तुल, २ जिवंत काडतुसे आणि २ मोबाईल फोन मिळून आले. यानंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरावर छापा टाकून कसून झडती घेतली. घराच्या झडतीत आणखी एक स्टील मॅगझिन असलेली पिस्तुल आणि एक देशी कट्टा जप्त करण्यात आला.
मध्य प्रदेशातून मागवली होती शस्त्रे; कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराला धमकावण्याचा कट!
पोलिसांच्या पोलिसी खाक्यासमोर आकाश थापाने धक्कादायक कबुली दिली. ही सर्व घातक शस्त्रे त्याचा साथीदार योगेश सीरीया (रा. गवलीपुरा, सदर) याने मध्य प्रदेशातील खंडवा येथील आकाश भाई याच्याकडून मागवली होती. काही दिवसांपूर्वीच नागपूर मध्यवर्ती कारागृहातून (सेंट्रल जेल) जामिनावर सुटलेला कुख्यात गुन्हेगार विशाल मेश्राम याला आपल्या गँगमध्ये ओढण्यासाठी तसेच त्याला व त्याचा साथीदार कुणाल समुद्रेला धमकावण्यासाठी आकाश थापा, योगेश सीरीया आणि गिट्टीखदान येथील अभय यांनी ही शस्त्रे हवेत नाचवून दहशत निर्माण केली होती.
फरार आरोपींचा शोध सुरू; ‘या’ पथकाने केली कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
सदर यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (क्राईम) राजेंद्र दाभाडे, डीसीपी दीपक अग्रवाल आणि एसीपी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट-५ चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, एपीआय गणेश कदम, पीएसआय विशाल सांगोले व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी बजावली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *