नवेगाव बांधला राष्ट्रीय इको-टुरिझम केंद्र बनवण्याची मागणी
एआय कॅमेरे, बचाव केंद्र आणि महिला बचत गटांना रोजगारासाठी निधी द्या — राजकुमार बडोले
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची वार्षिक बैठक वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत अर्जुनी-मोरगावचे आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नवेगाव बांध पर्यटन संकुल, माधवझरी आणि मुरदोली पर्यटन गेट यांच्या विकासासाठी राज्य योजनेतून निधी, वन्यजीव बचाव व उपचार केंद्र, कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले कॅमेरे, हंगामी मजुरांची सुरक्षा आणि महिला बचत गटांसाठी रोजगारनिर्मिती अशा ठोस मागण्या मांडल्या. बडोले म्हणाले, व्याघ्र प्रकल्पात केवळ संरक्षण नव्हे, तर पर्यटन वाढ आणि त्यातून स्थानिक रोजगारनिर्मिती हा दृष्टिकोन आता आवश्यक झाला आहे. मतदारसंघातील नवेगाव बांध पर्यटन संकुलाचा आणि नव्याने उभारलेल्या माधवझरी व मुरदोली पर्यटन गेटचा पर्यावरणपूरक पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. हा आराखडा स्वर्गीय पद्मश्री मारोतराव चितमपल्ली यांच्या निसर्गप्रेम, वनसंवर्धन आणि पक्षी-अभ्यासाच्या विचारांना अभिवादन करणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यात स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरण शिक्षण, स्थानिक समुदायाचा सहभाग आणि शाश्वत रोजगार यांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. हा आराखडा प्रत्यक्षात आला तर नवेगाव बांध परिसर राष्ट्रीय स्तरावरील आदर्श इको-टुरिझम केंद्र म्हणून विकसित होईल आणि निसर्ग व मानव यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होईल.
राजकुमार बडोले यांनी बैठकीत पाच मुद्दे स्पष्टपणे मांडले. पहिला, नवेगाव बांध पर्यटन प्रकल्पासाठी राज्य योजनेतून पुरेसा निधी तातडीने मंजूर करावा, जेणेकरून आराखडा कागदावर राहणार नाही. दुसरा, नवेगाव बांध येथे वन्यजीव बचाव व उपचार केंद्र सुरू करावे. जखमी, आजारी किंवा अडचणीत सापडलेल्या वन्यजीवांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी आणि जिल्ह्यातील बचाव यंत्रणा मजबूत व्हावी. तिसरा, मागील काळात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. अन्य ठिकाणी यशस्वी ठरलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या कॅमेऱ्यांची या भागात तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी निधी द्यावा. यामुळे वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल, संघर्ष कमी होईल आणि शेतकरी व ग्रामस्थांची सुरक्षा वाढेल. चौथा, जंगलात काम करणाऱ्या हंगामी मजुरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तरतूद करावी. त्यांना विमा कवच, सुरक्षा साहित्य आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था मिळावी. पाचवा, माधवझरी पर्यटन गेट येथे महिला बचत गटांना रोजगार मिळेल अशा प्रकारे निधी आणि संधी द्याव्यात. स्थानिक महिलांना पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि अतिथी सुविधा यातून स्थिर उत्पन्न मिळावे.
बडोले यांनी सांगितले की, पद्मश्री मारोतराव चितमपल्ली यांच्या कार्यातून प्रेरणा घेत हा विकास निसर्गाला हानी न पोहोचवता स्थानिकांच्या उदरनिर्वाहाशी जोडला गेला पाहिजे. नवेगाव-नागझिरा हा जिल्ह्याचा नैसर्गिक ठेवा आहे. पर्यटन वाढले, रोजगार निर्माण झाला आणि वन्यजीव संरक्षण मजबूत राहिले, तरच हा विकास अर्थपूर्ण ठरेल. त्यामुळे या मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

