LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

फ्लायओव्हरच्या नामकरणाविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन; जोरदार घोषणाबाजी

डॉ. हेडगेवार यांच्या नावाला विरोध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवरायांचे नाव देण्याची मागणी; अनेक पदाधिकारी ताब्यात

नागपूर : कामठी मार्गावरील इंदिरा चौक ते दिघोरी चौकादरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या फ्लायओव्हरच्या नामकरणावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या फ्लायओव्हरला डॉ. केशव हेडगेवार यांचे नाव देण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या विविध आघाड्यांनी शनिवारी कमाल चौक येथे जोरदार आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, ज्या मार्गाचे नाव आधीपासूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाते, त्याच मार्गावरील फ्लायओव्हरला डॉ. हेडगेवार यांचे नाव देणे अत्यंत अयोग्य आहे. आंदोलकांनी मागणी केली की, या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक किंवा महाराज अग्रसेन यांसारख्या युगपुरुषांचे नाव देण्यात यावे. याशिवाय सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या फ्लायओव्हरच्या उपयुक्ततेवर आणि बांधकामाच्या गुणवत्तेवरही आंदोलकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी विशिष्ट बिल्डर्सच्या प्रकल्पांना फायदा पोहोचवण्यासाठीच हा प्रकल्प राबविल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. यापूर्वी कामठी रोड, सदर, विमानतळ आणि गोळीबार चौक येथील उड्डाणपुलांमधील त्रुटींमुळे नागरिकांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यातसरकारने नामकरणाच्या राजकारणात वेळ न दवडता शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांसारख्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी टीका काँग्रेसने केली. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई करत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल राऊत यांच्यासह बंडोपंत टेंभुर्णे, आसिफ शेख, दिनेश यादव, अभिषेक शंभरकर, गौतम अंबाडे, कल्पना द्रोणकर, जुल्फीकार भुट्टो, अजित सिंह, मंगेश सातपुते, सतीश पाली, नीलेश खोब्रागडे, सत्यम कोतुलवार, चेतन तरारे, पलाश लिंगायत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांना पाचपावली पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *