LatestNewsगोंदियाविदर्भ

जिल्हा शालेय नेमबाजी स्पर्धेत पोलीस शूटिंग रेंजच्या खेळाडूंचे यश

८ सुवर्णपदकांसह पटकावली १० पदके
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक
गोंदिया :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत नेमबाजी (शूटिंग) स्पर्धेत गोंदिया पोलीस शूटिंग रेंजच्या खेळाडूंनी अचूक निशाणा साधत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. पोलीस शूटिंग रेंजमध्ये नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन घडवत तब्बल ८ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक अशा एकूण १० पदकांची लयलूट केली आहे. या घवघवीत यशामुळे सर्व पदकविजेत्या खेळाडूंची विभागीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत १० मीटर ओपन साईट १४ वर्षांखालील मुलांच्या वयोगटात विहान टेंभुर्णीकर याने सुवर्णपदक, रियांश विठ्ठले याने रौप्यपदक, तर श्वेत विनोद चौधरी याने कांस्यपदक पटकावले. १० मीटर एअर पिस्टल १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ओजल चुटे हिने सुवर्णपदक, तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात जुनेरा सुभेदार हिने सुवर्णपदक मिळवले.
तसेच १० मीटर एअर पिस्टल १४ वर्षांखालील मुलांच्या गटात दिव्यांश मनोज मेंढे याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. १० मीटर ओपन साईट एअर रायफल १४ वर्षांखालील मुलींच्या गटात भारवी बिसेन हिने सुवर्णपदक, तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ईशांत लोथे याने सुवर्णपदक पटकावले. १० मीटर पीप साईट रायफल १७ वर्षांखालील मुलांच्या गटात भूषण नैलेश शेंडे याने आणि १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सुजल अग्रवाल याने सुवर्णपदक संपादन केले.
खेळाडूंच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनील दरेकर, वेल्फेअरचे पोलीस निरीक्षक योगीराज जाधव, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे तसेच प्रशिक्षक पोलीस हवालदार नैलेश शेंडे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले असून आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *