सौंदड उड्डाणपुलाची खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
८ ऑक्टोबरपर्यंत पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे निर्देश
गर्डरचे उर्वरित काम दर्जेदार व युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश
सौंदड/सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे उर्वरित काम कोणत्याही परिस्थितीत तातडीने पूर्ण करून हा पूल येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करा, असे स्पष्ट व कडक निर्देश भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. खासदार पडोळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन उड्डाणपुलाच्या कामाची बारकाईने पाहणी केली तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाचा दर्जा राखण्याच्या सक्त सूचना दिल्या.
सविस्तर वृत्त असे की, सौंदड येथे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम दीर्घकाळापासून सुरू असल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना प्रचंड वाहतूक कोंडी व अपघातांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी पुलाच्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. पुलावरील गर्डरचे काम आणि इतर शिल्लक राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना सौंदडवासीयांच्या सोयीसाठी सुसज्ज बस थांबा (बस स्टॉप शेड) उभारावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत सौंदडवासीयांना प्रवासात त्रास होता कामा नये, यावर त्यांनी भर दिला.

८ तारखेला पूल सुरू करू; अधिकाऱ्यांचे आश्वासन
पाहणीदरम्यान नॅशनल हायवेचे संबंधित अधिकारी जिचकार आणि साईट इन्चार्ज चापले उपस्थित होते. खासदारांनी कामातील तांत्रिक अडचणी व प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा केली असता, अधिकाऱ्यांनी उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत पुलावरून वाहतूक निश्चितपणे सुरू केली जाईल, कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असा शब्द दिला. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रवाशांसाठी बस थांब्याचे नियोजन करण्याचे आश्वासनही दिले.
पदाधिकारी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या पाहणी दौऱ्याच्या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुसूदन दोनोडे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गंगाधर परशुरामकर, रोशन बडोले, दामोदर नेवारे, माजी सरपंच गायत्री, ग्रामपंचायत सदस्य समाधान बडोले, अनिल मेश्राम, नंदकिशोर डोंगरवार, शिवचरण शहारे, सौंदड गावच्या पोलीस पाटील निंबेकर मॅडम, राजाभाऊ गुबुले, भरत पंधरे यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

