गांधी जयंतीपासून गोंदिया जिल्ह्यात ‘सबकी योजना, सबका विकास’ अभियान
गोंदिया : महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात ‘सबकी योजना, सबका विकास’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या सुधारणा, नागरिककेंद्री उपक्रम आणि सार्वजनिक सेवांची माहिती ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यात आयोजित ग्रामसभांमध्ये या अभियानाची माहिती देण्यात येणार आहे.
या अभियानात पंचायतराज, ग्रामीण विकास, पेयजल व स्वच्छता, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन तसेच भूमी संसाधन विभागांचा सहभाग राहणार आहे. या उपक्रमाला ‘रिफॉर्म उत्सव’ अशी संकल्पना देण्यात आली आहे.
सशक्त ग्रामपंचायतीवर भर
पंचायतराज मंत्रालयाच्या माध्यमातून वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर, ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून ग्रामसभेच्या प्राधान्यक्रमानुसार विकासकामांचे नियोजन तसेच ‘स्वामित्व’ योजनेद्वारे ग्रामीण भागातील निवासी मालमत्ताधारकांना मालकी हक्काचे दस्तऐवज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
ग्रामीण रोजगार व महिला सक्षमीकरण
ग्रामीण विकास विभागामार्फत विकसित भारत @2047 च्या संकल्पनेशी सुसंगत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण कुटुंबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उपजीविकेची साधने निर्माण करणे, उत्पादक मालमत्ता निर्मिती आणि विविध योजनांचा समन्वय साधण्यावर भर राहणार आहे. तसेच ‘लखपती दीदी’ उपक्रमातून स्वयंसहायता समूहातील महिलांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पाणी व स्वच्छतेसाठी जनजागृती
जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गावे हागणदारीमुक्त करून त्यांचे हागणदारीमुक्त आदर्श गावांमध्ये रूपांतर करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
ग्राहक व अन्न सुरक्षा योजनांची माहिती
ग्राहक व्यवहार विभागामार्फत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन आणि तंत्रज्ञानाधारित तक्रार निवारण व्यवस्थेची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेची माहिती देण्यात येईल. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’मुळे लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून त्यांच्या हक्काचे अन्नधान्य घेता येते.
जलसंधारण व डिजिटल भूमिलेखावर भर
जलसंपदा विभागामार्फत ‘कॅच द रेन’सारख्या उपक्रमातून जलसंधारण व पाण्याचा जपून वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. भूमी संसाधन विभागामार्फत डिजिटल भूमिलेख, भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण आणि पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सुलभपणे लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
युवा व क्रीडा विभागांतर्गत ‘माय भारत’ स्वयंसेवक ग्रामसभांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच विविध सुधारणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करणार आहेत. यासोबतच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ प्रभावीपणे राबविण्यावरही भर देण्यात येणार आहे.

