नागपूर परिमंडळात महावितरणचा सर्जिकल स्ट्राईक!
1.19 कोटीच्या 958 वीज चोऱ्या उघडकीस
नागपूर : वीज चोरांचे धाबे दणाणत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने अनधिकृत वीज वापरकर्त्यांविरोधात जोरदार सर्जिकल स्ट्राईक केला आहे. सप्टेंबर 2026 या एकाच महिन्यात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा या तिन्ही मंडलांत धडक धाडी टाकून तब्बल 958 वीज चोऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला. या धडक मोहिमेमुळे चोरीची वीज वापरणाऱ्यांचे पितळ पुरते उघडे पडले आहे.
महावितरणच्या वीज चोरी विरोधी तपासणी पथकांनी संपूर्ण ताकदीने राबवलेल्या या मोहिमेत 958 पैकी 901 ग्राहकांचा काळाबाजार उघडकीस आणत 1 कोटी 19 लाख 40 हजार रुपयांच्या बिल व दंडाचा दणका देण्यात आला. महावितरणच्या आक्रमक पाठपुराव्यापुढे वीज चोरांना झुकावे लागले असून, अवघ्या काही दिवसांत 486 ग्राहकांकडून 65 लाख 70 हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 5 लाख 51 हजार युनिट्सची वीज चोरी निष्पन्न झाली असून त्यापैकी 3 लाख 7 हजार युनिट्सच्या दंडात्मक रकमेची वसुली पूर्ण झाली आहे.
नागपूर शहर मंडळात 387 वीज चोऱ्यांवर वीज चोरांवर सर्वाधिक हल्लाबोल झाला. यापैकी 372 ग्राहकांचे 55 लाख 90 हजार रुपयांचे उल्लंघन पकडले गेले असून 153 ग्राहकांकडून 21 लाख 40 हजार रुपयांची वसुली झाली. यामध्ये महाल विभागात 103, सिव्हिल लाईन्समध्ये 88, गांधीबागमध्ये 73, बुटीबोरीमध्ये 66 आणि काँग्रेस नगर विभागात 57 वीज चोरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे नागपूर ग्रामीण मंडळातही 374 प्रकरणे उघडकीस आली त्यापैकी 342 ग्राहकांना 46 लाख 90 हजार रुपयांचे बिल ठोकण्यात आले, ज्यापैकी 213 ग्राहकांकडून 31 लाख 20 हजार रुपये वसूल करण्यात आले. मौदा विभागात सर्वाधिक 130 चोऱ्या पकडल्या गेल्या, तर उमरेडमध्ये 90, सावनेरमध्ये 88 आणि काटोलमध्ये 66 प्रकरणांवर कडक कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, यापुर्वी 1 एप्रिलते 30 सप्टेंबर 2026 या सहा महिन्याच्या काळात परिमंडळात 2 कोटी रुअप्ये मुळ्याच्या तब्बल 1594 वीज चो-या उघडकीस आल्या होत्या, त्यात ग्रामिण मंडळात 588, शहर मंडळात 471 तर वर्धा मंडळातील 535 वीज चो-यांचा समावेश आहे.
तसेच वर्धा मंडळातही महावितरणने धडक मोहीम राबवून 197 प्रकरणे उघडकीस आणली. यापैकी 187 ग्राहकांना 16 लाख 60 हजार रुपयांचे बिल दिले गेले, ज्यापैकी 120 ग्राहकांकडून 13 लाख 20 हजार रुपये वसूल झाले. यामध्ये वर्धा विभागात 74, हिंगणघाटमध्ये 71 आणि आर्वी विभागात 52 प्रकरणे उघडकीस आली. कारवाईदरम्यान 351 ग्राहकांनी तडजोड शुल्क (कंपाऊंडिंग चार्जेस) भरून सुटका करून घेतली असली, तरी वीज चोरी करून अरेरावी करणाऱ्या आणि सहकार्य न करणाऱ्या 3 वीज चोरांवर पोलीस ठाण्यात थेट गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये गांधीबाग विभागात 2 आणि सावनेर विभागात 1 गुन्हा नोंदवला गेला आहे. प्रामाणिक ग्राहकांच्या हक्कावर दरोडा घालणाऱ्या आणि वीज यंत्रणेचे नुकसान करणाऱ्या वीज चोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महावितरणची ही धडक मोहीम यापुढे अधिक तीव्र होणार असून चोरीची वीज वापरणाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत, असा इशारा देत महावितरण प्रशासनाने सर्वांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे अंतिम आवाहन केले आहे.

