वाढदिवसाचा आनंद शोकात बदलला; गाईला वाचवताना २३ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
अर्जुनी मोरगाव: जन्मदिवशीच काळाने घाला घातल्याची एक हृदयद्रावक आणि अत्यंत दुर्दैवी घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहलगाव येथे घडली आहे. आपल्या लाडक्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात २३ वर्षीय तरुण विलास शंकर सोनवाने याचा मामा तलावात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे आज ६ मार्च रोजी विलासचा वाढदिवस होता, मात्र केक कापण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर झडप घातल्याने संपूर्ण कोहलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विलास सोनवाने हा नेहमीप्रमाणे आज शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपली गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. गावालगत असलेल्या मामा तलावावर तो जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेला असता, त्याची एक गाय पाण्याच्या आत खोलवर गेली. आपल्या मुक्या जनावराला संकटात पाहून विलासने तिला बाहेर काढण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने तो स्वतः खोल पाण्यात ओढला गेला आणि बुडाला.घटनेची माहिती मिळताच कोहलगाव येथील ग्रामस्थांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. घटनेची गांभीर्य लक्षात घेता नवेगाव बांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस आणि स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. विलासच्या निधनामुळे एका प्राणिप्रेमी आणि कष्टाळू तरुणाला गावाने गमावले असून, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाढदिवसाच्या आनंदाचे रूपांतर अशा शोकांतिकेत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

