भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँडचा ईव्ही बॅटरी प्रकल्प; तब्बल १५ हजार कोटींची महागुंतवणूक!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा : विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मिळणार गती
भंडारा/नागपूर : ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची दिग्गज कंपनी ‘अशोक लेलँड’ आपल्या विस्तार योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात भव्य ‘इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) बॅटरी प्रकल्प’ उभारण्याचा विचार करत आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्ष साकारल्यास भंडारा जिल्ह्यात तब्बल १०,००० ते १५,००० कोटी रुपयांची महाकाय गुंतवणूक होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. या भव्य प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला अभूतपूर्व गती मिळण्यासोबतच स्थानिक बेरोजगारांसाठी थेट व अप्रत्यक्ष रोजगाराचे मोठे दालन खुले होणार आहे.
कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी देशातील ऑटोमोबाईल व पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेगाने विस्तार होत असल्याचे सांगितले. नागपूर हे देशाची ‘लॉजिस्टिक्स कॅपिटल’ म्हणून उदयास येत असून, ड्राय पोर्टच्या सुविधेमुळे जागतिक बाजारपेठेत निर्यात करणे अत्यंत सुलभ झाले आहे. भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने जपानला मागे टाकत जगात तिसरे स्थान पटकावले आहे. सध्या या उद्योगाचे बाजारमूल्य २३ लाख कोटी रुपये असून पुढील पाच वर्षांत भारताला ऑटो क्षेत्रात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ बनतोय गुंतवणुकीचे मुख्य केंद्र
विदर्भ आता उद्योजकांसाठी गुंतवणुकीचे पसंतीचे केंद्र ठरत असल्याचे नमूद करत गडकरी म्हणाले की, महिंद्रा कंपनीने यापूर्वीच विदर्भात १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. मिहान प्रकल्पाने तब्बल १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. संपमुक्त संस्कृती, अनुकूल औद्योगिक धोरणे आणि सकारात्मक वातावरणामुळेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या विदर्भाकडे आकर्षित होत आहेत. याच साखळीत अशोक लेलँडचा प्रस्तावित बॅटरी प्रकल्प भंडारा जिल्ह्याचे भाग्य बदलणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकडून स्वागत
या संभाव्य महाप्रकल्पाचे स्वागत करताना भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आनंद व्यक्त केला. २०२४ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यापासून भंडारा जिल्ह्यात मोठे उद्योग यावेत व स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक लेलँडचा हा प्रकल्प साकारल्यास भंडारा जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर स्वतंत्र ओळख मिळेल आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

