LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

केशोरीत आगीचे तांडव; मडावी यांचे संपूर्ण घर जळून खाक, ११ लाखांचे नुकसान

अर्जुनी मोरगाव | नवचैतन्य
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील केशोरी येथे आज सोमवार, ४ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. सदाशीव शिवराय मडावी यांच्या घराला अचानक लागलेल्या या आगीत राहते घर आणि घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ११ लाख ८७ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सकाळी १० ते १०:३० च्या सुमारास अचानक घराला आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थ व केशोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडीला पाचारण करून पाण्याचा मारा करण्यात आला, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
या आगीत कुटुंबाचा वर्षभराचा धान्यसाठा, तांदूळ, भांडी, कपडे, खिडक्या-दरवाजे, लाकडी छत, पलंग आणि इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णतः जळाले आहे. ग्राम महसूल अधिकारी देवेंद्र बोरकर व मंडळ अधिकारी पी.एस. कुंभरे यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार, आगीत ५ लाख ५० हजारांचे दागिने व रोकड, ३ लाख १० हजारांचे फर्निचर, १ लाख ४२ हजारांचे धान्य, ७५ हजारांचे कपडे, ६० हजारांच्या इलेक्ट्रिक वस्तू आणि ५० हजारांची भांडी, असे एकूण ११ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या संयुक्त कुटुंबात ९ सदस्य असून, राहते घर जळाल्याने हे कुटुंब आता उघड्यावर आले आहे. प्रशासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *