नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू; वनवर्तुळात खळबळ
दोन हिंस्र प्राण्यांमधील झुंजीत बिबट्याचा जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज
तिरोडा : तिरोडा तालुक्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत (NNTR) येणाऱ्या सर्रा बीटमधील जंगलात एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बिबट्याच्या शरीरावर विविध ठिकाणी खोल व गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. दोन हिंस्र प्राण्यांमध्ये झालेल्या वर्चस्वाच्या जीवघेण्या झुंजीत वाघाच्या हल्ल्यामुळे या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. या घटनेमुळे व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ३० सप्टेंबर रोजी वनरक्षक आपल्या नियतक्षेत्रात नियमित गस्त घालत होते. त्यावेळी कक्ष क्रमांक १३२ च्या घनदाट जंगलात त्यांना एक बिबट्या जमिनीवर मृतावस्थेत पडून असलेला दिसून आला. वनकर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शीघ्र कृती दल (आरआरटी) आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची व मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता बिबट्याच्या अंगावर खोल ओरखडे व दातांच्या गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता एखाद्या मोठ्या हिंस्र प्राण्याशी, विशेषतः वाघाशी झालेल्या रक्तरंजित संघर्षात या बिबट्याचा बळी गेला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शवविच्छेदनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार
सहायक वनसंरक्षक मनीषा चौहान, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना टेंभरे, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर/नेवारे, जीवशास्त्रज्ञ हर्षद रहांगडाले आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नियमावलीनुसार मृत बिबट्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मृतदेहाचे रीतसर दहन करण्यात आले. दरम्यान, बिबट्याचा मृत्यू नेमका प्राण्यांच्या झुंजीत झाला की यामागे विषप्रयोग अथवा शिकारीचा काही संशय आहे, याचे अचूक कारण शोधण्यासाठी व्हिसेराचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून वनविभाग या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहे.

