LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

ॲक्टिव्हावरून गांजाची तस्करी; स्थानिक गुन्हे शाखेकडून २.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कामठा येथील तरुणाला रंगेहात बेड्या : चार किलो ५० ग्रॅम गांजा हस्तगत
गोंदिया :
जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई केली आहे. ॲक्टिव्हा मोपेडवर स्कूल बॅगेतून चार किलो ५० ग्रॅम ओलसर गांजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून रंगेहात जेरबंद केले. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी बटाणा ते मुंडीपार मार्गावर करण्यात आली असून, पोलिसांनी गांजा व दुचाकीसह एकूण २ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल (वय २६, रा. कामठा, ता. जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया जिल्ह्यात गांजासह इतर अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यादरम्यान, गोंदिया येथून एक इसम बटाणा ते मुंडीपार मार्गे ॲक्टिव्हा मोपेडवरून कामठा गावाकडे विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने बटाणा–मुंडीपार रोडवर नाकाबंदी लावली. दरम्यान, संशयित इसम ॲक्टिव्हाच्या समोरील बाजूस लहान मुलांची स्कूल बॅग ठेवून मुंडीपार गावाच्या दिशेने येताना दिसला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला घेराव घालून थांबवले आणि चौकशी केली. पंचांसमक्ष त्याच्याजवळ असलेल्या स्कूल बॅगेची तपासणी केली असता, त्यामध्ये ब्राऊन रंगाच्या बॅगमध्ये प्लास्टिक टेपने गुंडाळलेले चार मोठे आणि एक लहान खाकी बंडल आढळून आले. ते बंडल उघडून पाहिले असता त्यात पाने, फुले आणि बिया मिश्रित चार किलो ५० ग्रॅम हिरवा ओलसर गांजा मिळून आला.
२.७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपीकडून २ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचा ४ किलो ५० ग्रॅम गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली ७० हजार रुपयांची ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण २ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी उमेश उर्फ करण अग्रवाल याच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी आरोपीसह जप्त मुद्देमाल ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अमरदीप खाडे, पोलीस अंमलदार संजय चौहान, दिक्षितकुमार दमाहे, महेश मेहर, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, सोमेंद्रसिंह तुरकर, रियाज शेख, भोजराज बहेकार, विठ्ठल ठाकरे, राजकुमार खोटेले, छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, कुणाल बारेवार, राम खंदारे, विलेश ठाकरे तसेच सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके व अश्विन वंजारी यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *