LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गोंदिया जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट: ६६ प्रकल्पांत केवळ १२.४८% जलसाठा; सिंचन विसर्ग ठप्प!

मध्यम, लघु व मालगुजारी तलावांतील जलपातळी खालावलीमान्सून लांबल्याने खरिपाच्या पेरण्या संकटात

गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून आणि उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे गोंदिया जिल्ह्यावर पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि माजी मालगुजारी अशा एकूण ६६ जलप्रकल्पांमधील पाणीसाठा कमालीचा घटला असून, सध्या केवळ १२.४८ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. अनेक तलाव आता मृत साठ्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाने १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्व ६६ प्रकल्पांची एकूण पाणी साठवणूक क्षमता ११०.५२१ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. मात्र, सद्यस्थितीत त्यात केवळ १३.७९८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा उरला आहे. पाणीटंचाईची तीव्रता पाहता, प्रशासनाने शेतीसाठी सोडण्यात येणारा सिंचन विसर्ग पूर्णपणे बंद केला असून उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. मध्यम प्रकल्पांत ‘संग्रामपूर’ची स्थिती गंभीर जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २०.२४ टक्के (२०.१८ दशलक्ष घनमीटर) साठा आहे. यामध्ये चुलबंद प्रकल्पात सर्वाधिक ३६.८४ टक्के पाणी असले, तरी बोदलकसा (२७.०८%), रेंगेपार (२३.७०%), खैरबंदा (१५.२२%), मानगड (१५.२६%) आणि चोरखमारा प्रकल्पात अवघे १३.१६ टक्के पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे, संग्रामपूर मध्यम प्रकल्पाची स्थिती अत्यंत नाजूक असून, तिथे केवळ ४.२२ टक्के साठा उरल्याने परिसरातील गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागण्याची शक्यता आहे.

लघु आणि मालगुजारी तलाव कोरडेठाक होण्याच्या मार्गावरजिल्ह्यातील २० लघु प्रकल्पांची अवस्था बिकट झाली असून, त्यात केवळ १०.११ टक्के पाणी शिल्लक आहे. मुंडीपार, पळसगाव आणि पालडोंगरी या प्रकल्पांतील जलपातळी मृत साठ्याजवळ पोहोचली आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ३६ माजी मालगुजारी तलावांमध्ये तर अवघा ८.१५ टक्के साठा उरला आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने हे तलाव वेगाने कोरडे पडत आहेत.गळती आणि बाष्पीभवनाचा मोठा फटकाअर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोकणा, सडक अर्जुनी तालुक्यातील खाडीपार, आणि गोरेगाव तालुक्यातील तेढा व ताडगाव परिसरातील जलसाठे झपाट्याने आटत आहेत. लेंढेझरी, मुंडीपार आणि पळसगाव प्रकल्पांमध्ये बाष्पीभवनासोबतच जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाणी वाया जात असल्याचे अहवालात नमूद आहे. सालेकसा तालुक्यातील खेडेपार आणि आमगाव तालुक्यातील घाटटेमणी बंधाऱ्यांमधील उपयुक्त साठा जवळपास संपुष्टात आला आहे.बळीराजा चिंतेत; पेरण्या खोळंबल्या!१ जूनपासून पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली आहे. काही भागांत किरकोळ सरी कोसळल्या असल्या, तरी जलसाठ्यात वाढ होण्यासाठी त्या पुरेशा ठरलेल्या नाहीत. मान्सून आणखी लांबल्यास पिण्याच्या पाण्यासोबतच खरीप हंगामातील पेरण्या धोक्यात येण्याची दाट शक्यता असून शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *