LatestNewsगोंदिया

गोंदियात रेल्वे स्थानकालगतच्या ‘राधिका लॉज’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना उद्ध्वस्त, ४ पीडित महिलांची सुटका

लॉज मालक जगदीश भामनानीला बेड्या : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची धडक कारवाई; शहर पोलिसांत गुन्हा दाखल
गोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरामध्ये देहव्यापार चालणाऱ्या ‘राधिका लॉज’वर पोलिसांनी पंचांसमक्ष धाड टाकून कुंटणखाना उद्ध्वस्त केला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने १ ऑक्टोबर रोजी ही धडक कारवाई केली असून, या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर लॉजचा मालक तथा चालक जगदीश भामनानी याला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील लॉज व हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया रेल्वे स्टेशन लगत असलेल्या ‘राधिका लॉज’मध्ये पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून देहव्यापार करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने पंचांना सोबत घेऊन राधिका लॉजवर अचानक छापा टाकला. त्यावेळी लॉज चालक तथा मालक जगदीश भामनानी (वय ५४ वर्षे, रा. हेमू कॉलनी चौक, यादव चौक, गोंदिया) हा चार महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे रंगेहात मिळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही पीडित महिलांची सुटका केली आणि आरोपी भामनानी याला ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल; सखोल तपास सुरू
या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपी जगदीश भामनानी याच्याविरुद्ध अप. क्र. ८०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२)(३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (पिटा) १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत आणि या महिलांना कुठून आणले गेले होते, याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक मनीषा निकम, सहायक फौजदार जितेंद्र मिश्रा, पोलीस हवालदार बलराज लांजेवार, रूपेश सुखदेवे, महिला पोलीस हवालदार शिल्पा बडवाईक, पोलीस शिपाई रवींद्रकुमार मेश्राम, महिला पोलीस शिपाई मंजू बागडे आणि चालक महिला पोलीस शिपाई सुरेखा मेंढे यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *