संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार विनोद अग्रवाल उद्या मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात भेटणार
अपुऱ्या पावसाने धान उत्पादक शेतकरी संकटात : मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा; सर्वच तालुक्यांचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी
गोंदिया : हवामानातील प्रतिकूल बदल आणि पावसाच्या दीर्घ खंडामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक बळीराजा भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी करपणाऱ्या धान पिकांची गंभीर स्थिती पाहता आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण गोंदिया जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल उद्या, २९ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया जिल्ह्यात यंदा पावसाने दगा दिल्याने अनेक भागांत सिंचनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून धान पिके संकटात सापडली आहेत. या विदारक परिस्थितीची दखल घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली आणि जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
केवळ एका तालुक्यापुरता दुष्काळ मर्यादित ठेवणे अयोग्य
शासनाने केवळ एका तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून इतर नुकसानग्रस्त तालुक्यांकडे दुर्लक्ष करणे अन्यायकारक असल्याचे आमदार अग्रवाल यांनी स्पष्ट केले. गोंदिया, देवरी, आमगाव, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या सर्वच तालुक्यांमध्ये कमी पावसामुळे धानाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्व तालुक्यांमधील नुकसानीचे तात्काळ संयुक्त सर्वेक्षण (पंचनामे) पूर्ण करून संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना देणार प्रत्यक्ष निवेदन
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांना शासकीय मदतीचा आधार मिळवून देण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल २९ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रत्यक्ष निवेदन सादर करणार आहेत. संपूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विमा भरपाई, कृषी कर्जमाफी आणि इतर आवश्यक सोयी-सवलती नियमानुसार लागू कराव्यात, अशी जोरदार मागणी ते या बैठकीत लावून धरणार आहेत.

