अदासी विविध कार्यकारी संस्थेत ८४.६६ लाखांचा धान अपहार; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ जणांवर गुन्हा दाखल
जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांत कारवाई : २४२९ क्विंटल धानाची परस्पर विल्हेवाट
गोंदिया : मौजा अदासी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शासकीय धानाची आणि बारदान्याची परस्पर विल्हेवाट लावून तब्बल ८४ लाख ६६ हजार १७२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी मनोज व्ही. बाजपेयी यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, नियंत्रक व ग्रेडरसह एकूण १५ जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहितीनुसार, अदासी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित (नोंदणी क्र. २३७) येथे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून एकूण ४२,७००.४० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. यापैकी जिल्हा पणन कार्यालयाने (डीएमओ) ‘डिलिव्हरी ऑर्डर’ (डीओ) दिलेल्या राईस मिलर्सना ४०,२७०.५१ क्विंटल धानाची उचल देण्यात आली. मात्र, शिल्लक राहिलेल्या २,४२९.८९ क्विंटल धानाची उचल देण्यात आली नाही.
शासकीय मालमत्तेची परस्पर विक्री करून अपहार
संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने संगनमत करून उर्वरित २,४२९.८९ क्विंटल धानाची कोणतीही अधिकृत नोंद न ठेवता अप्रामाणिकपणे परस्पर विल्हेवाट लावली किंवा खुल्या बाजारात परस्पर विक्री केली. याशिवाय ३२,५०८ नग जुने बारदाने (किंमत ११ लाख ०५ हजार २७२ रुपये) आणि ४,००० नग नवीन बारदाने (किंमत २ लाख ८९ हजार ९२० रुपये) यांचाही अपहार करण्यात आला. धान, जुने व नवीन बारदाने आणि शासनाचा आधारभूत दर (१९४० रु. प्रति क्विंटल) व दंडात्मक वसुली असे मिळून एकूण ८४ लाख ६६ हजार १७२ रुपयांच्या शासकीय मालमत्तेचा अपहार करून शासनाची उघड फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या १५ पदाधिकाऱ्यांवर नोंदवला गुन्हा :
जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी (वय ५२) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तिलकमंचद जगतराम पटले (वय ४५, रा. हनुमान नगर, अदासी), उपाध्यक्ष संजय सेवकराम शहारे (वय ४०, रा. पोवारीटोला), संचालक महादेव रामाजी मेश्राम (वय ३८, रा. अदासी), शंकर निलकंठ कुरंजेकर (वय ४०, रा. पोवारीटोला), सेवकराम रूपचंद चौधरी (वय ३६, रा. पोवारीटोला), अनिल मारोती खोटेले (वय ४५, रा. अदासी), शामा मारोती खोटेले (वय ४३, रा. अदासी), जगदीश रामप्रसाद हल्तीमारे (वय ४४, रा. गोंडीला अदासी), गंगाराम जयपालकवार (वय ४२, रा. अदासी), रंजु श्रीराम निखाडे (वय ४४, रा. अदासी), हिराबाई सुखदेव चौधरी (वय ४५, रा. पोवारीटोला), तालीकराम नथ्थु पारधी (वय ३९, रा. हनुमान नगर, अदासी), संजय चंद्रप्रकाश खंडेलवाल (वय ४८, रा. अदासी), नियंत्रक बिके बोरकर (वय ४६, रा. अदासी) आणि ग्रेडर ओमेश्वर सुखदेव चौधरी (वय ४५, रा. पोवारीटोला) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोसले करीत आहेत.

