गावठी मशरूमच्या शोधात जंगलात जाणं ठरलं जीवघेणं! वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी
२४ तासांनंतर छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह
गडचिरोली : मशरूम आणण्यासाठी जंगलात गेलेल्या ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी वसा गावालगतच्या जंगल परिसरात उघडकीस आली. बाळू विठ्ठल राऊत (वय ४५, रा. वसा) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे वसा परिसरात तीव्र खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळू राऊत हे बुधवारी सकाळी मशरूम आणण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला. जंगल परिसरात शोध घेत असताना त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. मोबाईलचे लोकेशन शोधण्यासाठी सायबर सेलच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले; मात्र मोबाईल बंद असल्याने त्यांचे ठिकाण निश्चित करता आले नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी जंगलाचा परिसर पिंजून काढत शोधमोहीम तीव्र केली. गुरुवारी सकाळी वसा गावालगतच्या जंगलात राऊत यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. धडापासून पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले असून, सुमारे १२ मीटर अंतरावर पाय पडलेला असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात वाघाचा वावर असल्याने राऊत यांच्यावर वाघानेच हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन झाणक यांच्यासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वसा येथे भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली व राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

