LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

‘कट’चा राग अनावर; ट्रकचा पाठलाग करून कारचालकाने फोडल्या काचा

जनता कॉलेज चौकात तणाव : शहरातील वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
चंद्रपूर :
शहरातील जनता कॉलेज चौकात मंगळवारी सायंकाळी एका ट्रकने कारला कट मारल्याने संतप्त झालेल्या कारचालकाने ट्रकचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला अडविले आणि दगडाने ट्रकच्या काचा फोडल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास जनता कॉलेज चौकात एमएच-२२ एएन-४०४६ क्रमांकाच्या ट्रकने एमएच-३४ बीएफ-२९२१ क्रमांकाच्या कारला कट मारला. या धडकेत कारच्या बाजूचा पत्रा निघाला. अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतरही ट्रकचालक वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघून गेला.
क्षणात पेटला वाद, पोलिसांनी टाळला अनर्थ
कट लागून कारचे नुकसान झाल्यानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबविल्यामुळे कारचालकाचा संताप अनावर झाला. यामुळे संतप्त झालेल्या कारचालकाने ट्रकचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर ट्रकूला अडविले असता मोठ्या शिताफीने चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. यामुळे संतप्त झालेल्या कारचालकाने दगडाफेक करून ट्रकच्या पुढील काचा फोडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली व वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. दरम्यान, चौकातील सिग्नलवरील वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पक्षांना शांत केले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील वाद टळला.
चौकातील अनियमित पार्किंग पुन्हा चर्चेत
रस्त्यांची रुंदी झाली कमी: या घटनेनंतर जनता कॉलेज चौकातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरातील दुचाकी शोरूम तसेच नव्याने उभारलेल्या व्यावसायिक इमारतींसमोर रस्त्यालगत बेशिस्तपणे चारचाकी वाहने उभी केली जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहनांना वळण घेताना अडचणी निर्माण होतात. परिणामी किरकोळ अपघात आणि वादाच्या घटना वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्षाचा आरोप: नागरिकांच्या मते, वाहतूक पोलिसांकडून सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई होत असली तरी रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या बेकायदा पार्किंगकडे दुर्लक्ष केले जात आहे. जनता कॉलेज चौकातील वाहतूक कोंडी आणि अनियमित पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *