दोन वर्षांपासून मनरेगाचे पैसे थकल्याने ‘मैं भी कॉकरोच’ म्हणत ग्रा.पं. सदस्याचे ‘भीक मांगो’ आंदोलन
गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयात अनोखा निषेध; अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ
गोंदिया : सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या ‘मैं भी कॉकरोच’ या ट्रेंडचा लोण आता गोंदिया जिल्ह्यातही पोहोचला आहे. रोहयो (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे हक्काचे पैसे मागील दोन वर्षांपासून रखडल्याने संतप्त झालेल्या एका ग्रामपंचायत सदस्याने चक्क ‘मैं भी कॉकरोच’चे बॅनर गळ्यात अडकवून जिल्हा परिषद कार्यालयात ‘भीक मांगो’ आंदोलन केले. गुरुवार, २१ मे रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या अनोख्या आणि तीव्र आंदोलनामुळे जि. प. प्रशासनात एकच खळबळ उडाली असून काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुनील गिरडकर (सदस्य, ग्रामपंचायत पिपरटोला, ता. आमगाव) असे आंदोलन करणाऱ्या आक्रमक लोकप्रतिनिधीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमगाव तालुक्यातील पिपरटोला ग्रामपंचायत अंतर्गत दोन वर्षांपूर्वी मनरेगाची विविध कामे करण्यात आली होती. या कामांवर गावातील अनेक गरीब मजुरांनी आपले रक्त-घाम गाळून काम केले. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मागील दोन वर्षांपासून या मजुरांच्या मजुरीचे पैसे रखडलेले आहेत. मजुरांना हक्काचे पैसे मिळावेत यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरडकर यांनी पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत आणि संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून पाठपुरावा केला. परंतु, ढिम्म प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. या आंदोलनाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून, ‘मैं भी कॉकरोच’ म्हणत प्रशासनाला आरसा दाखवणाऱ्या या लोकप्रतिनिधीच्या आंदोलनानंतर आता तरी मजुरांचे पैसे बँक खात्यात जमा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘मैं भी कॉकरोच’ म्हणत थेट जिल्हा परिषदेत भीक मागितली!
प्रशासनाच्या या आडमुठ्या आणि निष्काळजी धोरणाला कंटाळून अखेर सुनील गिरडकर यांनी गांधीगिरी आणि आक्रमकतेचा सुवर्णमध्य साधत अनोखे पाऊल उचलले. त्यांनी डोक्यावर घमेले घेतले आणि गळ्यात ‘मैं भी कॉकरोच’चे पोस्टर लावून थेट गोंदिया जिल्हा परिषद कार्यालय गाठले. तिथे त्यांनी प्रशासनाचा निषेध करत थेट अधिकाऱ्यांकडे आणि कर्मचाऱ्यांकडे भीक मागण्यास सुरुवात केली. एका लोकप्रतिनिधीला आपल्या मजुरांसाठी अशा प्रकारे भीक मागावी लागत असल्याचे पाहून उपस्थित नागरिक आणि अधिकाऱ्यांची काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली.
आपली भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न!
“मागील दोन वर्षांपासून मनरेगाच्या थकीत मजुरीसाठी वारंवार पाठपुरावा केला; मात्र त्याची दखल न घेतल्याने आज भीक मांगो आंदोलन करून आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आता तरी मजुरांचे हक्काचे पैसे द्यावेत.” – सुनील गिरडकर, ग्रामपंचायत सदस्य, पिपरटोला.

