डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून कामगाराची निर्घृण हत्या
मुंडीपार एमआयडीसी परिसरात खळबळगंगाझरी पोलिसांत गुन्हा दाखल
गोंदिया : एमआयडीसी मुंडीपार परिसरामध्ये मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री कामावर जाणाऱ्या एका ५८ वर्षीय कामगारावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून जागीच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या थरारक हत्याकांडाने मुंडीपार औद्योगिक वसाहतीसह संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे. रविशंकर उदयलाल रहांगडाले (वय ५८, रा. मुंडीपार) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेने गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी परिसरात पोलीस गस्त व बंदोबस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.सविस्तर वृत्त असे की, रविशंकर रहांगडाले हे मंगळवारी, दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७:३० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते. ते एमआयडीसी मुंडीपार परिसराच्या मार्गावरून जात असताना, दबा धरून बसलेल्या काही समाजकंटक अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला. मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर अत्यंत निर्घृणपणे सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर रक्तस्त्राव झाल्याने रविशंकर यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या थरारक घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गंगाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.रविशंकर रहांगडाले यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून किंवा कोणत्या जुन्या वैमनस्यातून झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी अपराध क्रमांक ४७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३(१) व इतर कलमांनुसार अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास केला जात आहे. दरम्यान, एमआयडीसी परिसरात वाढत्या असामाजिक घटकांच्या उपद्रवावर आळा घालण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी पोलीस गस्त सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

