LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

भरधाव ट्रकने वाघिणीला चिरडले; राष्ट्रीय महामार्गावर जागीच मृत्यू

लाखनी तालुक्यातील खुटसावरी फाट्याजवळील भीषण घटना

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (नागपूर–रायपूर) वर रस्ता ओलांडणाऱ्या एका पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघिणीला भरधाव अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच तडफडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. हा भीषण अपघात लाखनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खुटसावरी फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास घडला. या अपघातानंतर धडक देणारा ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला असून, वनविभागाने तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत.सविस्तर वृत्त असे की, लाखनी परिसरातील लाकूड डेपोच्या बाजूकडून ही पट्टेदार मादी वाघीण राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होती. त्याच वेळी नागपूरकडून रायपूरच्या दिशेने प्रचंड वेगात जाणाऱ्या एका अज्ञात अवजड ट्रकने तिला थेट जोरदार धडक दिली. हा आघात इतका भीषण होता की, ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे गंभीर मार लागून वाघिणीचा घटनास्थळावरच क्षणात मृत्यू झाला.घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दीराष्ट्रीय महामार्गावर वाघिणीचा अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील गावांमधील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मृत वाघिणीच्या देहाचा रीतसर पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे.वन्यजीवांच्या महामार्ग सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्हवनक्षेत्रातून आणि वन्यजीवांच्या कॉरिडॉरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांच्या वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने अशा जीवघेण्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. गतिरोधक, भुयारी मार्ग (अंडरपास) आणि वेग मर्यादांचे फलक असूनही वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवत असल्याने मौल्यवान वन्यजीवांना जीव गमवावा लागत आहे. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात ट्रकचा व चालकाचा शोध सुरू केला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *