वडिलांसोबत शेतात गेलेल्या दोन बहिणींचा विहिरीत बुडून अंत!
सेलू येथील कोलगाव शिवारातील दुर्दैवी घटना
सेलू, वर्धा : वडिलांनी आपल्या दोन मुलींना शाळेतून घेऊन शेतात नेले, मात्र वाटेतच काळाने घाला घातला. दोन्ही बहिणींचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारी ही दुर्दैवी घटना कोलगाव शिवारात २३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे साटोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिव्या सचिन साटोने (वय ८) आणि उन्नती सचिन साटोने (वय १०) अशी मृत पावलेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुड शेफर्ड शाळेत शिकणारी उन्नती आणि स्कूल ऑफ ब्रिलियंटमध्ये शिकणारी दिव्या या दोन्ही मुलींना वडील सचिन साटोने यांनी बाहेरगावी जायचे असल्याचे सांगून शाळेतून सोबत घेतले होते. त्यानंतर त्यांनी मुलींना कोलगाव शिवारातील शेतात नेले. तेथे पाणी पिण्यासाठी दोन्ही मुली विहिरीकडे गेल्या असता त्यांचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही मुली विहिरीत पडल्याचे दिसताच वडील सचिन यांनीही त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली, मात्र त्यांना यश आले नाही. दोन्ही बहिणींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवानासचिन साटोने यांना तीन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी देवयानी ही ‘स्कूल ऑफ ब्रिलियंट’मध्ये सहाव्या वर्गात शिकत असून, ती गावातच गणपती कार्यक्रमात जेवणासाठी गेली होती. घटनेची माहिती मिळताच शिवारातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांच्यासह पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, प्रशांत श्रीवास्तव, राकेश देवगडे, मंगेश राऊत आणि नितीन डाखोळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने दोन्ही चिमुकलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह सेलू ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या अपघातामागील नेमके कारण काय, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

