जंगलातील ‘हायप्रोफाइल’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३१ जणांना अटक, १.३४ कोटींचा मुद्देमाल जप्त
२२ चारचाकी व ६ दुचाकी वाहने जप्त; ३७ जणांवर गुन्हे दाखल
कोरची (गडचिरोली ) : कोरची तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या गहाणेगाठा जंगल परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ३१ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी २२ चारचाकी आलिशान वाहने, ६ दुचाकी, २६ मोबाईल फोन, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा मिळून तब्बल १ कोटी ३४ लाख १४ हजार १० रुपयांचा प्रचंड मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण ३७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे आंतरराज्यीय जुगार विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर व जुगारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, बेडगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत गहाणेगाठाच्या घनदाट जंगल परिसरात छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील श्रीमंत जुगारी एकत्र येऊन पत्त्यांवर लाखो रुपयांची बाजी लावत आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दिनेश खोटेले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचासमक्ष २० सप्टेंबर रोजी अचानक जंगलातील अड्ड्यावर छापा टाकला.
पोलिसांची चाहूल लागताच पळापळ; ३१ जणांना आवळल्या मुसक्या
पोलिसांची गाडी पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि काही जण घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले. मात्र, पोलिसांनी चहूबाजूंनी वेढा घालून सुरुवातीला २९ जणांना जागीच पकडले, तर पुढील तपासात आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण ३१ जुगार शौकिनांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे सर्व जुगारी कोरची येथील छत्रपती बांगरे, छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील अमजदखाँ पठाण, राजनांदगाव येथील तालीब (रा. डोंगरगड), राजा ब्रँड ऊर्फ राजा श्रीवास आणि हेमंत राजपूत यांच्या सांगण्यावरून व आयोजनावरून येथे जुगार खेळण्यासाठी आले होते. या मुख्य पाच संशयितांची या रॅकेटमध्ये नेमकी काय भूमिका होती, याचा सखोल तपास पोलीस करत असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
महिन्याभरात कोरची तालुक्यात दुसरी मोठी धडक कारवाई!
विशेष बाब म्हणजे, कोरची तालुक्यात अवघ्या एका महिन्यात झालेली ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी कोटगुल भागात अशाच एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी २३ चारचाकी, ५ दुचाकी वाहनांसह ३४ जणांना अटक केली होती. त्यानंतर आता थेट बेडगाव जंगल परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याचे समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या या जंगलांमध्ये छत्तीसगडमधून नेटवर्क चालवून इतके मोठे हायप्रोफाइल अड्डे कोणाच्या आशीर्वादाने भरविले जात होते? या अड्ड्यांना कोणाचे संरक्षण लाभले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस या संपूर्ण आंतरराज्यीय सिंडिकेटचा मुळापासून छडा लावणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

