अतिवृष्टी अन् चक्रीवादळाचा वडेगाव/बांध्याला तडाखा९७ घरे अंशतः तर २ घरे पूर्णतः उद्ध्वस्त!
१० जण गंभीर जखमी, गावाची दाणादाण
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील वडेगाव/बांध्या येथे मंगळवार, २९ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास आलेल्या भीषण अतिवृष्टी आणि विनाशकारी चक्रीवादळाने संपूर्ण गावाला पार झोडपून काढले. अवघ्या एक-दोन मिनिटांत वादळाने गावात तांडव घातले असून ९७ घरे अंशतः उद्ध्वस्त झाली तर २ घरे पूर्णतः जमिनीदोस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीत घराच्या भिंती व कवेलू अंगावर पडल्याने एकूण १० नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

तालुक्यातील वडेगाव/बंध्या परिसराला २९ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. सुसाट वारा आणि पावसाने कहर केला. यामुळे गावासह परिसरात एकच दाणादाण उडाली. वादळाच्या तडाख्यामुळे घरांची पडझड होऊन बाबुराव नैताम (६५), महेंद्र नैताम (३५), नंदशिला महेंद्र नैताम (३२), अभिजीत महेंद्र नैताम (११), प्रांजली महेंद्र नैताम (१३), संजय राजाराम ताराम (३५), निमुरिता संजय ताराम (१०), प्रफुल संजय ताराम (७), गौरव विजय ताराम (१५) आणि मंदा प्रकाश कोकोडे (६०) हे १० जण जखमी झाले. जखमींना तातडीने केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कुरखेडा व गडचिरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अतिवृष्टी व वादळाने गावात तांडव घातले असून ९७ घरे अंशतः उद्ध्वस्त झाली तर २ घरे पूर्णतः जमिनीदोस्त झाली आहेत. वादळाची तीव्रता एवढी भीषण होती की बाबुराव नैताम व संजय ताराम यांची दोन्ही घरे पूर्णतः पडली आहेत. तसेच पुसाराम जगझापे यांच्या शेतातील ३३ सागवान व दोन बांबूची झाडे कोसळली. रस्त्यांवर शेकडो झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गावातील वीजखांब आणि तारा तुटल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, वडेगाव/बांध्याचे सरपंच घनश्याम शहारे, नायब तहसीलदार खुशाल कावळे, केशोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि चेतन ठेकने, महावितरणचे कनिष्ठ अभियंता पवन कुमार चव्हाण, क्षेत्र सहाय्यक अशोक मेश्राम, ग्राम महसूल अधिकारी देवेंद्र बोरकर, विजय निमकर आणि ग्रामपंचायत अधिकारी विजय खुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत व पाहणीचे काम सुरू केले.
महागाव-माहुरकुडाचा संपर्क तुटला
सततच्या मुसळधार पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. महागाव ते अर्जुनी मोरगाव मार्गावरील माहूरकुडा येथील नाल्याला पूर आल्याने दोन्ही गावे संपर्काबाहेर गेली होती. पुराचे पाणी थेट रस्त्यावरून व आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरल्याने शेकडो एकरातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पर्यायी मार्ग नसल्याने अनेक नागरिक व वाहनचालक जीव धोक्यात घालून महापुराच्या पाण्यातून वाहने काढण्याचा धोकादायक प्रयत्न करत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तर नुकसान झाल्याने पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

