वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका : २ ट्रॅक्टरसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हे दाखल
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : डुग्गीपार व गोंदिया ग्रामीण हद्दीत नाकाबंदी करून आवळल्या मुसक्या
गोंदिया : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोमवारी वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर आणि २ ब्रास रेती असा एकूण १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांवर संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक जिल्ह्यात गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा सालईटोला ते देविटोला रस्त्यावर करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रस्त्यावर नाकाबंदी केली असता, देविटोलाकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टरला थांबवून झडती घेतली. यावेळी ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास वाळू मिळून आली. चालकाकडे कोणतीही रॉयल्टी किंवा वाहतूक परवाना नव्हता. उमरझरी नाल्यातून ही वाळू चोरी करून विक्रीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ७ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ६ हजार रुपयांची वाळू असा ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक व मालक उमाकांत मनोहर लंजे (वय ३२, रा. कोहळीटोला आदर्श, ता. सडक अर्जुनी) याच्याविरुद्ध डुग्गीपार पोलिसांत गुन्हा दाखल केला.
कारंजा-डव्वा मार्गावर दुसरा ट्रॅक्टर पकडला
दुसरी कारवाई गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारंजा ते डव्वा रस्त्यावरील रेल्वे फाटकजवळ करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी नाकाबंदी करून कारंजाकडून येणारा संशयित ट्रॅक्टर अडवला. तपासणीत ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास चोरीची वाळू आढळून आली. ही वाळू चोरी करून कारंजा येथील मैदानात लपवून ठेवली होती व ती विक्रीसाठी नेली जात होती. पोलिसांनी ८ लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि ६ हजार रुपयांची वाळू असा ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक जगदीश कोहळे (वय ३८) व ट्रॅक्टर मालक दिनेश तांडेकर (वय ३५, दोघेही रा. कवलेवाडा, ता. जि. गोंदिया) या दोघांविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार सोमेन्द्रसिंग तूरकर, दीक्षितकुमार दमाहे, भोजराज बहेकार, तुलसीदास लुटे, दुर्गेश तिवारी, पोलीस शिपाई सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर आणि चालक पोलीस शिपाई विलेश ठाकरे यांनी केली.

